अदानी समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानींनी मंगळवारी (२६ जुलै) झालेले वार्षिक सर्वसाधारण सभेत वाढती महागाई, विस्कळीत अन्नधान्य पुरवठा, लोकांचे वाढते विस्थापन, आरोग्य सेवांचा फोलपणा, शिक्षण क्षेत्रात आलेले साचलेपण, चलन बाजारातील अस्थिरता आणि अडखळती रोजगार निर्मिती या प्रश्नांचा उल्लेख करत भाषण केलं. या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. यात त्यांनी अदानी समुहाने केलेल्या कामाचीही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौतम अदानी म्हणाले, “आज घडीला जग ज्या वातावरणातून जात आहे त्याला “अनिश्चित” म्हणणेही पुरेसे होणार नाही. वाढती महागाई, विस्कळीत अन्नधान्य पुरवठा, लोकांचे वाढते विस्थापन, आरोग्य सेवांचा फोलपणा, शिक्षण क्षेत्रात आलेले साचलेपण, चलन बाजारातील अस्थिरता आणि अडखळती रोजगार निर्मिती या साऱ्या लक्षणांमधून विविध पातळ्यांवर आलेल्या संकटांच्या घातक परिणामांशी सामना करण्याची सर्वच देशांची क्षमता पणाला लागली आहे हे स्पष्ट दिसते.”

“गेल्या १८ महिन्यांत कोविड -१९ ची महामारी स्थिती भारताने इतर देशांच्या तुलनेत चांगली हाताळली हे नाकारता येणार नाही. या १८ महिन्यांत भारतात प्रतिबंधक लसीचे २०० कोटी डोस देण्यात आले – ही संख्या उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोप यांच्या एकूण लोकसंख्ह्येपेक्षा जास्त आहे. यातून जगाला एक ऐतिहासिक शिकवण मिळाली असेल. कितीही कठीण परिस्थिती असली तरी भारत त्यातून सावरून पुन्हा उभा राहू शकतो हेच यातून सिद्ध झाले आहे,” असं गौतम अदानी यांनी सांगितलं.

अदानी पुढे म्हणाले, “सध्याच्या रशिया युक्रेन संघर्षांत भारताने कोणतीही बाजू न घेता ठाम भूमिका घेतली आहे. या राजनीतिक भूमिकेतून दिसलेल्या भारताच्या आत्मविश्वासाबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. भविष्यातील बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय स्थितीत भारत अभिमानाने आपले स्थान टिकवेल याचे हे द्योतक आहे. वातावरणातील बदलांबाबत आपल्याला अनेकदा उपदेश केला जातो, पण भारताने कोव्हिड च्या काळात आणि ऊर्जा संकटात असूनही पुनर्वापर करण्याच्या स्रोतांपासून वीज निर्मितीत वाढ केली आहे.”

“अनेक विकसित देशांनी त्यांची पुनर्वापरक्षम वीजनिर्मिती ची उद्दिष्टे स्थगित ठेवली असताना भारताने केलेली हे कामगिरी लक्षणीय आहे. पुनर्वापर करण्याच्या स्रोतांपासून होणा-या वीज निर्मितीची भारताची क्षमता २०१५ पासून आजवर ३०० टक्क्यांनी वाढली आहे. अशा वीजनिर्मिती भारतात २०२१-२२ मध्ये २०२०-२१ च्या तुलनेत १२५ टक्के भांडवल गुंतवण्यात आलेले आहे. विजेच्या वाढीव मागणीपैकी ७५ टक्क्यांहून जास्त मागणी पुनर्वापरक्षम स्रोतांपासून निर्मिली जात असून ही प्रगती रोखणे आता कोणालाही शक्य नाही,” असंही अदानींनी सांगितलं.

“या सर्व पार्श्वभूमीवर भारताने समतोल साधत केलेल्या वाटचाली बद्दल सरकारला पूर्ण श्रेय द्यावे लागेल. कोव्हिड संकटातून सावरत असताना अनेक बड्या देशांना मंदीचा सामना करावा लागत आहे. असं असतानाच भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने प्रगती करत आहे. आपल्या व्यवसायाच्या संदर्भात मिळालेल्या संकेतांवरून मी असे खात्रीने म्हणेन की भारताच्या अर्थव्यवस्थेची ८ टक्के अंदाजित वृद्धी प्रत्यक्ष पहायला मिळेल,” असं त्यांनी नमूद केलं.

गौतम अदानी पुढे म्हणाले, “आता मी आपल्या कंपनीविषयी काही सांगेन. अदानी समूहाच्या दृष्टीने २०२१-२२ हे वर्ष महत्वपूर्ण होते. मी अनेकदा म्हणतो की, आपल्या भूतकाळाबद्दलचा अभिमान आपली भविष्यातील क्षमता अधोरेखित करतो आणि त्यातूनच आपण सध्या नव्या योजनांची आखणी करीत आहोत. भारतात गुंतवणूक करण्याच्या आमच्या भूमिकेवर आहोत आणि या गुंतवणुकीचा वेग कमी झालेला नाही.”

“आमच्या व्यवसायाची व्याप्ती, वैविध्य आणि आमची सातत्यपूर्ण कामगिरी याच्या आधारावर आम्ही भविष्यात चांगली प्रगती करण्यासाठी सिद्ध आहोत. भारताच्या आणि भारतवासीयांच्या आकांक्षांबद्दल आम्हाला वाटणारी श्रद्धा आम्हाला आत्मविश्वास देते. भारताच्या प्रगतीशी संलग्न धोरणांचा स्वीकार हेच अदानी समूहाच्या यशाचे गमक आहे आणि प्रगतीची संधी भारताइतकी अन्य कोणत्याही देशाला नाही असे माझे ठाम मत आहे,” असं अदानींनी सांगितलं.

“भविष्यातील प्रगतीबद्दलचा आमचा विश्वास अधोरेखित करणारा पुरावा म्हणजे हरित ऊर्जा क्षेत्राकडील भारताच्या वाटचालीला साह्य करण्यासाठी केलेली ७० अब्ज डॉलर गुंतवणूक. जगातील प्रमुख सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये आम्ही याआधीच स्थान मिळविले आहे. या क्षेत्रातील आमच्या क्षमतेच्या आधारावर आम्हाला भविष्यात हायड्रोजन वायू इंधन म्हणून वापरण्यासाठीच्या प्रयत्नांत मोठे योगदान देता येईल. खनिज तेल आणि वायू यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेला देश ते भविष्यात हरित ऊर्जा निर्यात करणारा देश या भारताच्या परिवर्तनात आमची आघाडीची भूमिका असेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

अदानी पुढे म्हणाले, “पुनर्वापरयोग्य ऊर्जेच्या बाबतीत आमचे जगातील स्थान बळकट होत असले तरी गेल्या १२ महिन्यांत इतर अनेक उद्योगात आम्ही लक्षणीय प्रगती साधली आहे. आम्ही आता देशातील सर्वात मोठी विमानतळ व्यवस्थापन कंपनी आहोत. आमच्या व्यवस्थापनातील विमानतळाच्या सभोवतीच्या परिसरात नवी वित्तीय केंद्रे वसविण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत.”

“भारतातील पायाभूत सुविधा विकासाच्या प्रक्रियेत आम्ही सहभागी आहोत आणि देशातील सर्वात मोठ्या रस्ते बांधणी प्रकल्पांबरोबरच बंदरे, मालवाहतूक व्यवस्थापन, वीज पारेषण आणि वितरण, पाईपलाइन द्वारे पुरविण्याचा गॅस अशा व्यवसायांमध्ये आमचा मोठा हिस्सा आहे. अदानी विल्मारच्या यशस्वी समभाग विक्रीनंतर आम्ही देशातील देशातील सर्वात मोठी ग्राहकोपयोगी वस्तू विकणारी कंपनी झालो आहोत. होलसिमचा व्यवसाय विकत घेतल्या. यात एसीसी आणि अंबुजा सिमेंट या नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे आम्ही आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सिमेंट उत्पादक झालो आहोत,” अशी माहिती अदानींनी दिली.

हेही वाचा : विश्लेषण: अदानी समूहाला कंत्राट देण्यासाठी मोदींचा दबाव; श्रीलंकेतील अधिकाऱ्याचा आरोप आणि राजीनामा; नेमकं काय घडलंय?

“संलग्न व्यवसाय या आधारावर धंदा वाढविण्याच्या आमच्या धोरणाचे हे एक उदाहरण आहे. याशिवाय डेटा सेंटर, डिजिटल सुपर अॅप आणि संरक्षण, विमान निर्मिती, धातू , आणि औद्योगिक सामग्री यांसारख्या सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” धोरणाशी सुसंगत व्यवसायातही आम्ही प्रवेश केला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.