Jeet Adani Diva Shah Marriage : मुलाच्या विवाहानिमित्त उद्योगपती गौतम अदाणी यांनी दहा हजार कोटी रुपये समाज कार्यांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. जीत गौतम अदाणी यांच्या विवाहानिमित्त गौतम अदाणी यांनी समाजसेवेसाठी जाहीर केलेली ही रक्कम वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाणार आहे. आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील पायाभूत उपक्रमांसाठी या देणगीतील सर्वात जास्त रक्कम वापरण्यात येणार आहे. या उपक्रमातून, समाजातील सर्व घटकांना परवडण्याजोग्या दरातील जागतिक दर्जाची रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालय, तसेच परवडणाऱ्या दरातील पण उच्च दर्जाच्या के ट्वेल्व्ह शाळा आणि कौशल्य विकास शिक्षण तसेच नोकरीची हमी देणाऱ्या जागतिक दर्जाच्या कौशल्य अकादमी स्थापन केल्या जातील.
मुलाच्या विवाह प्रसंगी गौतम अदाणी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले, “परमपिता परमेश्वराच्या आशीर्वादाने जीत आणि दिवा हे दोघे आज विवाहबद्ध झाले आहेत. हा एक अत्यंत छोटा आणि वैयक्तिक घरगुती समारंभ होता. त्यामुळे इच्छा असूनही सर्व हितचिंतकांना या विवाहासाठी बोलवणे आम्हाला शक्य झाले नाही, त्यामुळे आम्हाला क्षमा करावी. दिवा आणि जीत यांच्या विवाहानिमित्त आपण त्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत हीच माझी इच्छा आहे.”
अहमदाबाद मधील अदाणी शांतीग्राम वसाहती मधील बेलवेदर क्लब मध्ये आज दुपारी जीत आणि दिवा यांचा विवाह झाला. हिरे व्यापारी जैमिन शहा याची दिवा ही कन्या आहे. हा विवाह अत्यंत साधेपणे आणि नेहमीच्या परंपरागत धार्मिक रीतीरिवाजांनुसार आणि नंतर परंपरागत गुजराती पद्धतीनुसार झाला. यासाठी फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र अशा मोजक्या मंडळींची उपस्थिती होती.
जीत अदाणी हे सध्या अदाणी एअरपोर्ट्सचे संचालक आहेत. या कंपनीतर्फे सहा आंतरराष्ट्रीय विमानतळांचे व्यवस्थापन केले जाते आणि नवी मुंबई येथील सातव्या विमानतळाच्या उभारणीचे कामही कंपनीतर्फे केले जात आहे. जीत यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिलव्हेनियाज स्कूल ऑफ इंजीनियरिंग अॅप्लाईड सायन्स मधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.
या विवाहाच्या दोन दिवस आधी गौतम अदाणी यांनी यानिमित्त मंगल सेवा हा समाजसेवी उपक्रम जाहीर केला होता. याद्वारे ५०० विवाहित दिव्यांग वधूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले होते.