गेल्या काही दिवसांपासून गौतम अदाणी आणि त्यांचा अदाणी उद्योग समूह चर्चेचा विषय ठरला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीपर्यंत श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे अदाणी यांची आता पहिल्या दहामधूनही घसरण झाली आहे. हिंडेनबर्ग रीसर्चनं तयार केलेल्या अहवालामध्ये अदाणी उद्योग समूहावर फसवणुकीचे गंभीर आरोप केल्यानंतर अदाणी उद्योग समूहाची आर्थिक पत ढासळल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी अदाणी समूहानं प्रचंड गाजावाजा केलेला कंपनीचा FPO गुंडाळल्याने अनेकांच्या मनात अदाणी उद्योग समूहाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यासंदर्भात आता खुद्द अदाणींनीच गुंतवणूकदार आणि भागधारकांना स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं काय झालं?
बुधवारी दिल्लीत एकीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करत असताना दुसरीकडे मुंबईत शेअर बाजारात उलथापालथ होत होती. सुरुवातीला किमान १००० अंकांनी वधारल्यावर शेअर बाजार कोसळला. दिवसअखेर सकाळी घेतलेली वाढही शेअर बाजारानं गमावली. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या चिंता वाढल्या असतानाच रात्री अदाणी उद्योग समूहाकडून त्यांचा FPO गुंडाळण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यासाठी सर्व खरेदीदारांचे पैसे परत करणार असल्याचंही अदाणी समूहाकडून जाहीर करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर समूहाच्या भवितव्याविषयी गुंतवणूकदारांच्या मनात शंका उपस्थित होऊ लागली आहे.
Adani FPO: गौतम अदाणींनी सांगितलं एफपीओ गुंडाळण्यामागचं कारण; म्हणाले, “काल बाजारपेठेत…!”
…म्हणून FPO गुंडाळला!
दरम्यान, गुंतवणूकदार आणि भागधारकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी एक व्हिडीओ जारी केला असून त्यामध्ये त्यांनी या सर्व घडामोडींवर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. “आमचे एफपीओ पूर्णपणे विक्री झाल्यानंतर काल आम्ही ते एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. पण काल शेअर बाजारात निर्माण झालेली अस्थिरता पाहाता आमच्या बोर्डाला असं वाटलं की या एफपीओचे व्यवहार अशाच प्रकारे सुरू ठेवणं नैतिकतेला धरून राहणार नाही”, असं अदाणींनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
“धोरणांचा पुनर्विचार करणार”
दरम्यान, यापुढे अदाणी समूहाचं काय नियोजन असणार आहे, याबाबत बोलताना गौतम अदाणींनी आपल्या धोरणांचा पुनर्विचार करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. “आम्ही यापुढेही दीर्घकाळ संपत्ती तयार करणं आणि विकासावर लक्ष केंद्रीत करत राहणार आहोत. एकदा शेअर बाजार स्थिर झाला की आम्ही आमच्या निर्णयांचा पुनर्विचार करू. आमचा प्रत्येक व्यवसाय जबाबदार पद्धतीने संपत्ती बनवण्यासाठी प्रयत्नशील राहील”, असं ते म्हणाले.
‘Hindenburg’च्या आरोपांनंतर अदाणी समूहाकडून ४१३ पानांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “हा भारतावर…”
“हा निर्णय आमच्या सध्याच्या कामकाजावर कोणताही परिणाम करणार नाही. आम्ही यापुढेही प्रकल्पांवर वेळेत अंमलबजावणी सुरू करून ते पूर्ण करत राहणार आहोत. आमच्या कंपनीचे मूलभूत तत्व फार मजबूत आहेत. आमची संपत्ती आणि आर्थिक स्थैर्य कायम आहे. कर्ज चुकवण्याचा आमचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे”, असंही अदाणींनी नमूद केलं.