अदाणी ग्रुपने देशातील विविध राज्यांमध्ये आपला उद्योग विस्तारण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपुर्वीच अदाणी ग्रुपने कर्नाटक, ओडिशामध्ये मोठी गुंतवणूक केली. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या राज्यात खूप मोठी गुंतवणूक करण्याची तयारी सुरु आहे. अदाणी ग्रुपचे प्रमुख गौतम अदाणी यांनी मध्य प्रदेश राज्यात ६० हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. एनर्जी टू पोर्ट हा ग्रुप मध्य प्रदेशमध्ये ऊर्जा, शेती आणि कोळसा क्षेत्रात ही गुंतवणूक होणार आहे. अदाणी एंटरप्राइजेसचे संचालक प्रणव अदाणी यांनी सांगितले की, या गुंतवणुकीमुळे मध्य प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विकास तर होईलच त्याशिवाय रोजगार देखील वाढतील.
हे ही वाचा >> गौतम अदाणींनी ‘शिवतीर्था’वर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट, कोणत्या विषयावर झाली चर्चा?
मध्य प्रदेशसाठी गुंतवणूकीचा मेगा प्लॅन
इंदौर येथे संपन्न झालेल्या ग्लोबल इनव्हेस्टर्स समिट (Global Investors Summit) मध्ये प्रणव अदाणी सहभागी झाले होते. तिथे बोलत असताना ते म्हणाले की, मध्य प्रदेशमधील युवकांना रोजगारक्षण कौशल्य विकसित करण्यासाठी ते कौशल्य विकास केंद्र देखील चालविणार आहेत. राष्ट्रीय राजमार्ग क्र. ४७ च्या काही भागात चार पदरीकरण करणे, एक गॅस लिंक योजना आणि एक मोठी सूक्ष्म सिंचन प्रणाली त्यांच्याकडून स्थापन केली जाणार आहे. तसेच शेतमाल विकत घेण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये एक मोठा फूडपार्क देखील बांधला जाणार आहे. यासोबत अलावा, धार, गुना, दमोह, उज्जैन आणि इंदौर येथे मल्डी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारले जाणार आहे.
सिमेंट उत्पादन क्षमता वाढविणार
मध्य प्रदेशमध्ये सिमेंट उत्पादन वाढिवण्यासाठी अदाणी ग्रुपने विशेष तयारी देखील केली आहे. अमेठा, देवास आणि भोपाल येथे तीन सिमेंट उत्पादन संयंत्र स्थापन करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी जवळपास ३,५०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे मध्य प्रदेशची सिमेंट उत्पादन क्षमता जवळपास तीन पटींनी वाढणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला ७५ लाख टन सिमेंट उत्पादन होईल. नूतनीकरणयोग्य ऊर्जा (Renewable Energy) या क्षेत्रात ३९ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.
हे देखील वाचा >> गुंतवणूक आणण्यासाठी गुजरात जाणार दावोसला, शिंदे-फडणवीस मात्र मुंबईतच मोदींच्या स्वागताला; संजय राऊतांची टीका
अदाणीसोबत रिलायंसही मध्य प्रदेशात गुंतवणूक करणार
अदाणी ग्रुप सोबत रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड देखील मध्य प्रदेशमध्ये दूरसंचार, नूतनीकरणयोग्य ऊर्जा आणि रिटेल आउटलेट्समध्ये ४०, ६०० कोटींची मेगा गुंतवणूक करणार आहे. सध्या यापैकी २२, ५०० ची गुंतवणूक पूर्ण झाली आहे. त्यासोबतच आदित्या बिर्ला ग्रुपही १५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळत आहे.