अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांचा १०० बिलियन अमेरिकन डॉलर्स संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत समावेश झालाय. अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकलं असून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या आकेडवारीतून ही माहिती समोर आलीय. सध्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानी अॅमेझॉनचे जेफ बेझोस तर तिसऱ्या स्थानी बर्नार्ड आरनॉल्ट तिसऱ्या स्थानी आहेत.
अदानी यांच्या संपत्तीमध्ये २४ बिलियन अमेरिकन डॉलर्सने वाढ झाली असून ते जगातील सर्वाधिक संपत्ती कमवणारे व्यक्ती ठरलेत. मागील वर्षभरापासून त्यांची संपत्ती प्रत्येक आठवड्याला सहा हजार कोटींची वाढत आहे. एकूण संपत्तीच्या यादीनुसार सध्या अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या स्थानी आहेत. या यादीमध्ये अंबानी हे ११ व्या स्थानी आहेत. त्यांनी ऑक्टोबर महिन्यात अव्वल दहामध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र सध्या त्यांच्या स्थानामध्ये थोडी घसरण झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ९९ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. या यादीत फेसबुकला मार्क झुकरबर्ग हा १२ व्या स्थानी आहे.
अदानी समूहाच्या खाण प्रकल्पाला ऑस्ट्रेलियामध्ये मोठा विरोध झाला. तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गपासून अनेकांनी या खाण प्रकल्पांना विरोध केल्याने अदानी समूहाबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार झाली. मात्र अदानींनी केवळ खनिजांवर लक्ष केंद्रीत न करता हरित ऊर्जा क्षेत्रामध्येही काम केलं. त्यांनी विमानतळ, डेटा सेंटर्स, शस्त्रनिर्मीती उद्योग यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करुन वाटचाल सुरु ठेवली. हीच क्षेत्र देशाचे दिर्घकालीन आर्थिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्वाची असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा व्यक्त केलंय.
मागील दोन वर्षांमध्ये अदानी समूहाच्या शेअर्सची किंमत ६०० टक्क्यांनी वाढलीय. २०७० मध्ये भारताचं झीरो कार्बन उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत असल्याने भविष्यातही अदानी समूहाला अच्छे दिन येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अब्जाधीशांच्या यादीमध्ये एकूण २१५ भारतीय आहेत जे देशात वास्तव्यास आहेत. जगभरातील मूळचे भारतीय असणाऱ्या अब्जाधीशांची संख्या गृहित धरल्यात अब्जाधीश भारतीयांची एकूण संख्या २४९ इतकी आहे.