गौतम अदानी यांना एकामागे एक आश्चर्याचे धक्के बसत आहे. अदानी यांनी आशियातील श्रीमंतांच्या यादीत घसरण झाली आहे. आता आशियातील दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्तीचा स्थानावरुन ते आता तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. शेअर बाजारामध्ये गौतम अदानींच्या कंपनीचे शेअर्स घसरल्यामुळे त्यांची संपत्ती कमी झाली आहे. गेल्या ३ दिवसांत गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ९.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ७० हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) नुसार, बुधवारी गौतम अदानी यांची संपत्ती जवळपास ४ अब्ज डॉलर्सने घसरून ६७.६ अब्ज डॉलरवर गेली. यामुळे आता चीनचा उद्योगपती झोंग शशान Zhong Shanshan पुन्हा आशियातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. तसेच मुकेश अंबानी अजूनही ८४.५ अब्ज डॉलर्स नेटवर्थ सोबत आशिया देशातील सर्वात श्रीमंत आहेत.

हेही वाचा- अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळल्यानंतर अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

अदानी गृपचे शेअर सोमवारपासून सतत घसरले आहेत. आज (गुरुवारी) ही बीएसईमध्ये अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर्स अंदाजे ८.५ टक्क्यांनी घसरून ६४५.३५ रुपयांवर गेले. या व्यतिरिक्त आज अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये ५ टक्के लोअर सर्किट लावण्यात आले आहे.

का कोसळले अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्स

शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) तीन परदेशी गुंतवणुकदारांवर कारवाई केली. एनएसडीएलने कारवाई केलेल्या या तिन्ही परदेशी गुंतवणूकदारांकडून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची खातीच एनएसडीएलने सील केल्यानं याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून आले. त्यामुळे सोमवारी अदानी ग्रुपच्या कंपन्याचे शेअरचे भाव घसरू लागले आणि ग्रुपच्या फ्लॅगशिप कंपनी अदानी एन्टरप्राईजेसचे शेअर्स २५ टक्क्यांनी घसरले, तर सर्व ग्रुप कंपन्यांच्या शेअर्सनी खालची पातळी गाठली.

हेही वाचा-सेन्सेक्स, निफ्टी विक्रमावरून खाली

तीन गुंतवणुकदारांवर का करण्यात आली कारवाई?

कारवाई करण्यात आलेल्या तिन्ही खात्यांचे गुंतवणूकदार मॉरिशिसस्थित असून, अदानी इंटरप्राईजेसमध्ये ६.८२ टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये ८.०३ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये ५.९२ टक्के, तर अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीमध्ये ३.५८ टक्के गुंतवणूक केलेली आहे. या संबंधात अदानी समूहाकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार खातेदारांच्या मालकी हक्कांविषयी पुरेशी माहिती न दिल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. खाती गोठवण्यात आल्यामुळे हे तिन्ही गुंतवणूकदार स्वतःकडील शेअर्स विकू शकत नाही आणि नवीन खरेदीही करू शकत नाहीत.

Story img Loader