Gautam Adani Post after JEE Aspirant Student Dies By Suicide : अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या स्पर्धात्मक परीक्षा जेईई मेन्सचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यानंतर उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे जेईई परीक्षेत नापास झालेल्या १८ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलीने आपल्या आई-वडीलांसाठी एक चिठ्ठी लिहिली होती, ज्यामध्ये तिने त्यांची माफी मागितली होती. ही घटना समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. यातच अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी देखील या घटनेची दखल घेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर विद्यार्थ्यांसाठी एक खास पोस्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अदाणी नेमकं काय म्हणाले?

उद्योगपती गौतम अदाणी यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी लिहिलेल्या या संदेशात मुलीच्या आत्महत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी आपण देखील शालेय जीवनात खूप हुशार विद्यार्थी नव्हतो असेही गौतम अदाणी म्हणाले आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर केलल्या पोस्टमध्ये अदाणी यांनी लिहिले की, “अपेक्षांच्या ओझ्याखाली दबल्याने एक हुशार मुलगी निघून जाणे हृदय पिळवटून टाकणारे आहे. आयुष्य हे कोणत्याही परीक्षेपेक्षा मोठं असतं- ही गोष्ट पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे आणि त्यांनी ती मुलांनादेखील समजावून सांगणे गरजेचे आहे. मी अभ्यासात खूपच साधारण होतो. अभ्यास आणि आयुष्य यामध्ये मी अनेक वेळा अपयशी झालो, मात्र प्रत्येकवेळी जीवनाने नवीन मार्ग दाखवला. माझी तुम्हा सर्वांना फक्त इतकीच विनंती आहे की, अपयशाला कधीही शेवट समजू नका. कारण आयुष्य नेहमी दुसरी संधी देतं…”

विद्यार्थ्यीनीची सुसाइड नोट

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) मेन २०२५ मध्ये कमी गुण मिळाल्याने निराश झालेल्या १२ वीच्या एका विद्यार्थीने आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने आधी पालकांची माफी मागितली त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या खोलीत तिने लिहिलेली सुसाईड नोट सापडली ज्यामध्ये तिने लिहिलं की, “आई आणि बाबा मला माफ करा. तुमची इच्छा मी पूर्ण करू शकले नाही. आपला एकत्र प्रवास इथेच संपतो आहे. आता रडू नका. तुम्ही दोघांनी मला अपार प्रेम दिले. पण मी तुमची स्वप्ने पूर्ण करू शकले नाही.” अशी खंत तिने सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे.