Jeet Adani Engagement: उद्योगपती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीतचा साखरपुडा झाला आहे. जीत यांची रविवारी अहमदाबादमध्ये दिवा जयमीन शाहबरोबर एंगेजमेंट झाली. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत ही एंगेजमेंट झाली. अदानी कुटुंबाची होणारी सून ही एका प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याची मुलगी आहे. सोशल मीडियावर जीत व दिवाचा एक फोटो समोर आला आहे.
सोशल मीडियावर जीत व दिवाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये जीत अदानी आणि दिवा पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. दिवाने एम्ब्रॉयडरी केलेला लेहेंगा घातला होता, तर जीत पेस्टल निळ्या कुर्त्यामध्ये सुंदर दिसत होते. जीत अदानी यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेसमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. जीत २०१९ मध्ये अदानी समूहात सामील झाले होते. ते सध्या कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. स्ट्रॅटेजिक फायनान्स, कॅपिटल मार्केट्स आणि रिस्क अँड गव्हर्नन्स पॉलिसीसंदर्भातील काम ते पाहतात.
अदानी समूहाच्या वेबसाइटनुसार, जीत अदानी विमानतळ व्यवसायासह अदानी डिजिटल लॅब्सचे नेतृत्व करत आहेत. दरम्यान जीत व दिवा यांची एंगेजमेंट झाली आहे, पण त्यांच्या लग्नाबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या अदानी कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.