अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मोठा धक्का दिलाय. अदानी हे आता अंबानींपेक्षा श्रीमंत झाले आहेत. विशेष म्हणजे केवळ भारतात नाही तर अदानी हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये अंबानींच्या एक स्थान वर म्हणजेच पहिल्या स्थानी पोहचलेत.
नक्की वाचा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?
गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची कायमच तुलना केली जाते. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल २०२० पासून अदानींच्या संपत्तीमध्ये मोठ्याप्रमाणामध्ये वाढ होत आहे. १८ मार्च रोजी अदानींची संपत्ती ४.९१ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती. मागील २० महिन्यामध्ये अदानींची संपत्ती १ हजार ८०८ टक्क्यांनी वाढलीय. म्हणजेच अदानींची संपत्ती ४.९१ बिलियन डॉलरवरुन ८३.८९ बिलियन डॉलरवर गेलीय. याच कालावधीमध्ये मुकेश अंबानींची संपत्ती २५० टक्क्यांनी म्हणजेच ५४.७ बिलियनने वाढलीय.
ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या पूर्वीच्या अहवालानुसार अदानींची एकूण संपत्ती ८८.८ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती. ही संपत्ती अंबानींच्या संपत्तीपेक्षा २.२ बिलियन अमेरिकन डॉलर्सने कमी होती. ‘इकनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार ओटूसी करार रद्द झाल्यामुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण झालीय. रिलायन्सचे शेअर्स १.०७ टक्यांनी घसरुन २ हजार ३६० रुपये ७० पैशांपर्यंत आले. तर दुसरीकडे अदानींच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आल्याने हा श्रीमंतांच्या यादीमधील बदल दिसून आल्याचं सांगितलं जातंय.
अदानी इंटरप्रायझेसचे शेअर्स २.९४ टक्क्यांनी वाढले असून त्यांची किंमत एक हजार ७५७ रुपये ७० पैसे इतकी होती. अदानी पोर्टचे शेअर्स ४.८७ टक्क्यांनी वाढून ७६४ रुपये ७५ पैशांपर्यंत गेलाय. अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये अर्धा टक्क्यांनी वाढ झाली असून त्याची किंमत १ हजार ९५० रुपये ७५ पैशांपर्यंत गेलीय. त्याचप्रमाणे अदानी पॉवर्सच्या शेअर्समध्ये ०.३३ टक्क्यांनी वाढ झाली असून हे शेअर्स १०६ रुपये २५ पैशांना उपलब्ध आहेत.