अदानी समूहाने अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी या कंपन्यांच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या गौतम अदानी यांनी आज पहिल्यांदाच कंपनीतील समभागधारक आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधला. शुक्रवारी एकूण ६.५ अब्ज डॉलरच्या (सुमारे ५२ हजार कोटी रुपये) मोबदल्यात कंपन्याचं संपादन केल्याचं अदानी समुहाकडून जाहीर करण्यात आलं होतं.
नक्की वाचा >> रशियामुळे भारताला ३५ हजार कोटींचा फायदा; जाणून घ्या नेमकं घडलं काय
“आजचा दिवस ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक यासाठी की, एका झटक्यात आम्ही आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सिमेंट उत्पादक झालो आहोत,” असं म्हणत गौतम अदानींने आपल्या भाषणाला सुरुवात केली. “हा दिवस ऐतिहासिक यासाठी देखील की, हा संपादन व्यवहार भारतातील पायाभूत सुविधा आणि साहित्य क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा देशांतर्गत पार पाडलेला ताबा व विलीनीकरण व्यवहार आहे. हा व्यवहार चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्णत्वासही नेण्यात आला,” असंही गौतम अदानी यांनी म्हटलं. “भारत आधुनिक जगात पाहिल्या गेलेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या आर्थिक मुसंडीच्या उंबरठ्यावर असताना या व्यवसायात आमचा प्रवेश होत असल्याचं समाधान आहे,” असंही त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
आपल्याला अनेकदा सिमेंट क्षेत्रातील गुंतवणुकीबद्दल अनेकजण विचारतात असं सांगत गौतम अदानींनी या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्यामागील कारण सांगितलं. “मला अनेकदा प्रश्न विचारला जातो – सिमेंट का? तर याच निमित्ताने या व्यवसायात प्रवेशामागील तर्काबद्दल सांगायचं झालं तर भारताच्या विकासपथावर आमचा अढळ विश्वास आहे. २०५० पर्यंत भारत २५ ते ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असेल असं आम्हाला वाटतं. यासंदर्भातील आकडेवारी तुम्हाला ठाऊक असेलच तरीही भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक देश आहे, हे मी येथे नमूद करी इच्छितो,” असं गौतम अदानी म्हणाले.
नक्की पाहा >> एक लाख गुंतवा पाच वर्षांत १३ लाख मिळवा! गुंतवणुकीचा उत्तम, सुरक्षित पर्याय ठरु शकते ‘ही’ सरकारी योजना; जाणून घ्या तपशील
“आपल्या येथे सिमेंटचा दरडोई वापर चीनच्या १,६०० किलोच्या तुलनेत फक्त २५० किलो आहे. म्हणजे वाढीसाठी जवळजवळ सात पटीने वाव असल्याचं यातून निरदर्शनास येतं. शिवाय, सरकारी स्तरावर अनेक कार्यक्रमांना गती मिळाल्याने, सिमेंटच्या मागणीतील दीर्घकालीन सरासरी वाढ जीडीपीच्या १.२ पट ते १.५ पट असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात आमचा अंदाज या संख्येच्या दुप्पट वाढ होण्याचा आहे,” असंही गौतम अदानींनी स्पष्ट केलं.
“पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रातील ट्रिलियन-डॉलरच्या गुंतवणुकीसह आपल्या देशाच्या विकासाचे नवीन गोष्ट उलगडत आहे. अशावेळी सिमेंट हा आपल्या पायाभूत सुविधा व्यवसायासाठी, विशेषत: अदानी समूहाचा बंदरे आणि दळणवळण तसेच लॉजिस्टिक व्यवसाय, हरित ऊर्जा व्यवसाय आणि विकसित होत असलेल्या ई-कॉमर्स व्यासपीठ या सर्वांसाठी एक समर्पक जोड व्यवसाय ठरेल,” असा विश्वास गौतम अदानींनी व्यक्त केला.
“या व्यवसायामध्ये उतरल्याने आम्हाला महत्त्वपूर्ण स्पर्धात्मक फायदा देण्याबरोबरच या माध्यमातून आम्हाला अतुलनीय प्रमाणात लाभ मिळवण्याची शक्यता आङे. माझा असाही विश्वास आहे की, अदानी समूहासारखा परिचालन कार्यक्षमतेइतकी सक्षमता असणारे आजच्याघडीला दुसरे कोणीही नाही आणि त्यामुळेच मागील वर्षांमध्ये आम्ही केलेल्या अनेक अधिग्रहणांमधून आम्हाला निश्चितच फायदा होईल. परिणामी, आम्ही लक्षणीय अंतराने विस्ताराने देशातील सर्वात फायदेशीर सिमेंट उत्पादक बनण्याची अपेक्षा आहे,” असंही गौतम अदानी म्हणाले.
“सध्याच्या ७० दशलक्ष टन क्षमतेवरून पुढील पाच वर्षांत १४० दशलक्ष टनांपर्यंत जाईल असा आमचा अंदाज आहे. माझ्या या आत्मविश्वासामागे बळ हे एसीसी आणि अंबुजा यांच्याकडून मिळणाऱ्या नेतृत्वाच्या एकत्रित ताकदीने दिले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही,” असंही गौतम अदानी यांनी या व्यवहाराबद्दल भाषणात म्हटलं.
आपण करत असलेली प्रत्येक कृती ही राष्ट्राच्या प्राधान्यक्रमांशी सुसंगत असावी आणि ती याच विश्वासाच्या दृष्टीकोनातून प्रेरीत असली पाहिजे. आपण रुजुवात केलेल्या मूल्य व्यवस्थेने आणि राष्ट्र उभारणीवरील विश्वास यांनी साधलेले परिणाम हे सर्वांसमोर साक्षात स्वरूपात आहेतच.