गेली पंधरा वर्षे टीम इंडियाचा अविभाज्य भाग राहिलेला, सलामीचा आक्रमक फलंदाज अशी ओळख असलेला खेळाडू गौतम गंभीर याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आज (मंगळवार) निवृत्ती जाहीर केली. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील अांध्र प्रदेश विरुद्धचा पुढील सामना हा आपला क्रिकेट विश्वातील शेवटचा सामना असेल. त्यामुळे  दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानातून क्रिकेटर म्हणून सुरु झालेला हा प्रवास आता शेवटाकडे आला आहे, असे गंभीरने म्हटले आहे.

निवृत्तीची घोषणा करताना गौतम गंभीरने फेसबुकवर एक इमोशनल व्हिडिओ पोस्ट केला आहे. गंभीरने २०१६मध्ये राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा सामना खेळला होता. त्याने ५८ कसोटी सामन्यांमध्ये ४१५४ धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यांत ५२३८ धावा आणि टी२० सामन्यांमध्ये एकूण ९३२ धावा केल्या आहेत. तो रणजी ट्रॉफीमध्ये क्रिकेटविश्वातील आपला शेवटचा सामना ६ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशविरुद्ध खेळणार आहे.

गंभीरने २००३मध्ये बांगलादेशविरुद्ध ढाका येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने एकूण १५,०४१ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करताना गौतम गंभीरने या संघाला २०१२ आणि २०१४ मध्ये दोनदा विजेतेपद मिळवून दिले आहे. २०११मध्ये वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध गंभीरने चमकदार कामगिरी केली होती. त्याने १२२ चेंडूंमध्ये ९७ धावा ठोकून टीम इंडियाचे नाव वर्ल्डकपवर कोरले होते. १९८३नंतर दुसऱ्यांदा भारताने हा वर्ल्डकप जिंकला होता. तसेच २००७मध्ये टी२० वर्ल्डकपमधील विजेत्या टीम इंडियाचाही तो भाग होता.

भारतीय क्रिकेटमधील आपल्या अतुलनीय योगदानाबद्दल गौतम गंभीरला २००८मध्ये प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Story img Loader