क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गौतम गंभीर राजकारणात येणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. गौतम गंभीर भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवू शकतो, अशी चर्चा देखील सुरु आहे. या चर्चेला गौतम गंभीरने पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मी तूर्तास याबाबत विचार केलेला नाही. पण मी जर निवडणुकीच्या रिंगणात उतरलो तर क्रिकेटपटू असल्याने मला मतदान करु नका, एक व्यक्ती म्हणून मला मतदान करा’, असे गंभीरने म्हटले आहे.

गौतम गंभीरने गेल्या महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. निवृत्तीनंतर गंभीर पुढे काय करणार, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. गंभीर हा प्रशिक्षक होणार की समालोचन करणार की राजकारणात जाणार, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गंभीर हा राजकारणात उतरणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. त्याला आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने ‘द क्विंट’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकारणात जाणार की नाही, याबाबत खुलासा केला.

गंभीर म्हणतो, खरे सांगावे तर मी अजून त्याबाबत विचारच केला नाही आणि जर भविष्यात मी तसा विचार केला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरलो तर मला क्रिकेटपटू गौतम गंभीर म्हणून मतदान न करता एक व्यक्ती म्हणून मतदान करा. तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर मला मतदान करा, असे त्याने सांगितले.  मी बदल घडवू शकतो, या देशातील लोकांचे राहणीमान उंचावू शकतो, असे तुम्हाला वाटले तरच मला मतदान करा. मला सत्तेची लालसा नाही, असे त्याने म्हटले आहे.

Story img Loader