विरोधी पक्षांमधील अनेक मोठे नेते सक्तवसुली संचालनालय, आयकर विभाग, गुन्हे अन्वेशन विभागासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अशाच एका प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा चालू आहे. अशातच केजरीवाल यांनी आज सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपात प्रवेश करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जातोय, असं केजरीवाल म्हणाले. भाजपात गेल्यावर सगळे खून माफ होतात, आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. काहीही झालं तरी आम्ही झुकणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम आदमी पार्टीचे प्रमुख केजरीवाल म्हणाले, “आजकाल हे लोक (भाजपा) आमच्या मागे लागले आहेत. तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचलंच असेल, मनीष सिसोदिया यांना भाजपाने तुरुंगात टाकलं आहे. हे म्हणतात सिसोदियांनी भ्रष्टाचार केला आहे. सकाळी सहा वाजता ते शाळा-शाळांमध्ये जायचे. कुठला भ्रष्टाचारी सकाळी शाळांमध्ये जातो. जो भ्रष्टाचार करतो तो मद्यपान करतो, त्याला इतरही अनेक प्रकारची व्यसनं असतात, त्याचबरोबर तो चुकीची कामं करतो. आम्ही यातलं काय केलं आहे? आम्ही दिल्लीच्या विकासासाठी काम करतोय. परंतु, हे लोक आमच्या मागे लागले आहेत.

अशातच पूर्व दिल्ली मतदारसंघाचे खासदार आणि केजरीवाल यांचे विरोधक, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी केजरीवाल यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गंभीर म्हणाले, सक्तवसुली संचालनालय, आयकर विभाग किंवा गुन्हे अन्वेशन विभागासारख्या ज्या शासकीय संस्था आहेत, त्यांना त्यांचं काम करू द्या. मला नेहमी असं वाटत आलं आहे की, जो खरा असतो तो निधड्या छातीने लढतो, तो पळून जात नाही आणि यालाच इमानदारी म्हटलं जातं. जो निधड्या छातीने लढतो तोच खरा योद्धा असतो. याउपर मी काहीच बोलू शकत नाही.

भाजपाचं माझ्याविरोधात षडयंत्र : केजरीवाल

अरविंद केजरीवाल म्हणाले, “त्यांनी (भाजपा) माझ्याविरोधात षडयंत्रं रचलं आहे. आम्ही शाळा आणि रुग्णालयं बांधत आहोत तर त्यात आम्ही काय चुकीचं केलं. तुम्ही या अरविंद केजरीवालला तुरुंगात पाठवा. तुम्ही आज आमचं काहीही बिघडवू शकत नाही. गरीब मुलांसाठी आम्ही शाळा उभारल्या. त्यांच्या आई-वडिलांचे आशीर्वाद हीच आमची ताकद आहे. ज्यांच्या मागे गरीबांचे आशीर्वाद असतात त्यांच्यामागे देवही उभा राहतो. तुम्ही कितीही षडयंत्र रचा, मी इथे सामोरा जायला उभा आहे. मी तुमच्यासमोर झुकणार नाही.