महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेला उत्तर प्रदेशचा माजी मंत्री गायत्री प्रजापती याचा जामीन पॉस्को न्यायालयाने आज मंजूर केला आहे. पॉस्को न्यायालयाचे न्यायाधीश ओम प्रकाश मिश्रा यांनी त्याला १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्याच्याबरोबरच दोन साथीदारालाही न्यायालयाने जामीन दिला आहे. १५ मार्च रोजी गायत्री प्रजापतीला अटक करण्यात आली होती.  अटकेआधी अनेक दिवस त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता. प्रजापती (वय ४९) याला शहराच्या आशियाना भागात १५ मार्च रोजी सकाळी अटक करण्यात आली. त्याला पॉस्को न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात प्रजापती व इतर सहा जणांवर प्राथमिक माहिती अहवाल दाखल करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. प्रजापती व इतरांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.  समाजवादी पक्ष सत्तेमध्ये होता त्यामुळे त्याला अटक करण्यात येत नव्हती अशी टीका विरोधकांनी केली होती. निवडणुका संपल्यानंतर त्याला त्वरित अटक करण्यात आली होती. पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी होत होता. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी त्याचा मोबाइल ट्रॅक केला होता परंतु त्यावर सतत लोकेशन बदलली जात होती असे पोलिसांनी म्हटले होते.

मी निरपराध आहे. मला बदनाम करण्याचा हा कट आहे. मी नार्को चाचणीला सामोरे जाण्यास तयार आहे. त्याचबरोबर अल्पवयीन मुलीचीही नार्को चाचणी करावी अशी मागणी प्रजापतीने अटकेनंतर केली होती. मी शरणागती पत्करायला जात असताना मला अटक केली असा दावा प्रजापती याने केला होता. पोलिसांनी त्याचा दावा फेटाळून लावला होता. प्रजापतीला अटक करण्यासाठी आम्हाला आमची शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च करावी लागली असे पोलिसांनी म्हटले. त्यामुळे प्रजापतीने केलेला दावा खोटा आहे असे पोलिसांनी सांगितले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gayatri prajapati granted bail in gang rape case