Joe Biden on Gaza Hospital Blast : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू असतानाच गाझातील अल-अहली या रुग्णालयात मंगळवारी (१७ ऑक्टोबर) रात्री भीषण स्फोट झाला. या स्फोटात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात अनेक लहान मुलंदेखील दगावली आहेत. या स्फोटानंतर हमास आणि इस्रायली सैन्याकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझातील रुग्णालयावरील हल्ल्याला इस्लामिक जिहाद जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं आहे. हमासनेच हा स्फोट घडवून आणल्याचा आरोप इस्रायली लष्कराने केला आहे. तर हमासने या हल्ल्यामागे इस्रायल असल्याचा आरोप केला आहे.
रुग्णालयातील स्फोटावर जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष आता बायडेन यांच्याकडे आहे. इस्रायलमधील मोठं व्यापारी शहर तेल अवीव येथे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि जो बायडेन यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोन्ही नेते प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी जो बायडेन यांनी गाझामधील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केलं. तसेच बायडेन नेतन्याहू यांना म्हणाले, काल गाझामधील रुग्णालयात झालेल्या स्फोटाचं वृत्त ऐकून मला दुःख झालं. मी आतापर्यंत जे काही पाहिलं आहे त्यावरून मला असं वाटतंय की हा हल्ला दुसऱ्या टीमने (हमास) केला होता.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, अमेरिकेचं इस्रायली जनतेबरोबर उभं राहणं हेच आमच्यासाठी सर्वकाही आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आमच्या देशात आलात हे खूप मार्मिक आहे. मी इस्रायली जनतेच्या वतीने आपले आभार मानतो. काल, आज आणि नेहमीच आमच्याबरोबर तुम्ही उभे राहिलात यासाठी तुमचे आभार. जो बायडेन यांनी युद्धाच्या परिस्थितीत इस्रायलचा दौरा करून जगाला संदेश दिला आहे की आम्ही इस्रायलबरोबर आहोत. तसेच यावेळी बायडेन म्हणाले, गाझातल्या रुग्णालयावर झालेला हल्ला हा इस्रायली सैन्याने नव्हे तर दुसऱ्या बाजूने झाला आहे.
दुसऱ्या बाजूला हमासद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ८०० लोकांचा बळी गेला आहे. यावर इस्रायली लष्कराने म्हटलं आहे की असे हल्ले आम्ही केलेले नाहीत, हमासनेच हे हल्ले घडवून आणले आहेत.
हे ही वाचा >> गाझामधल्या रुग्णालयातील स्फोटात ५०० बळी, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या हल्ल्यामागे…”
गाझा पट्टीतल्या रुग्णालयावरील हल्ल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील दुःखी झाले आहेत आहेत. त्यांनी या घटनेबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये मोदी यांनी म्हटलं आहे की गाझामधील अल अहली रुग्णालयात झालेल्या जीवितहानीचं वृत्त ऐकून मला धक्का बसला आहे. ही खूप दुःखद घटना असून पीडितांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या संवेदना, तसेच या स्फोटात जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. तिथे सध्या सुरू असलेल्या संघर्षात नागरिकांचे बळी जाणं ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. यात सहभागी असणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे.