हमास आणि इस्रायलचं युद्ध चालू होऊन २० दिवसांचा कालावधी लोटला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले चालूच आहेत. या युद्धात अनेक निरापराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात हमास आणि इस्रायलच्या युद्धाचं वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराचं कुटुंबही मारलं गेलं होतं. कुटुंबावर अंत्यविधी पार पाडल्यानंतर पत्रकारानं वार्तांकनास सुरूवात केली आहे.
इस्रालयने गाझा पट्टीतील नागरिकांना स्थलांतर होण्याचा इशारा दिला होता. यानंतर अल जझिराचे पत्रकार वेल दहदौह हे कुटुंबियांसह गाझातील निर्वासित छावण्यांमध्ये राहिले. अशातच गाझाच्या मध्यभागी असलेल्या नुसीरत छावणीवर इस्रायलनं बुधवारी बॉम्ब हल्ला केला. यामध्ये वेल दहदौह यांची यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवाचा मृत्यू झाला. या वृत्तानं जगभरात खळबळ उडाली.
हेही वाचा : विश्लेषण : इस्रायल-हमास युद्धामध्ये इराणचा छुपा हात?
गुरूवारी वेल दहदौह यांनी कुटुंबियांवर अत्यंसंस्कार केले. यानंतर संवाद साधताना वेल दहदौह म्हणाले, “कुटुंबियांचं दु:ख आहेच. पण, शक्य तितक्या लवकर वार्तांकन करणं, हे माझं कर्तव्य आहे. सगळीकडं गोळीबार, हवाई आणि बॉम्ब हल्ले चालूच आहेत. घडामोडींना वेग आलाय.”
हेही वाचा : “इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ५० ओलीस ठार”, हमासचा दावा; गुप्तचर अधिकारी म्हणाले…
दरम्यान, इस्रायलकडून करण्यात येत असलेल्या हवाई हल्ल्यामुळे २४ तासांत ४८१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य खात्यानं दिली. आतापर्यंत ७ हजार २८ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ६६ टक्के महिला आणि लहान बालकांचा समावेश आहे.