इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासमधील युद्धाला आता दोन आठवडे झाले आहेत. या दोन आठवड्यांमध्ये दोन्ही बाजूच्या हाजारो लोकांचा बळी गेला आहे. या युद्धामुळे जगभरातील देशांमध्ये दोन गट पडले आहेत. अमेरिका आणि इंग्लंडने इस्रायलचं खुलं समर्थन केलं आहे. दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांनी युद्धकाळात इस्रायलचा दौरा करून आपण या युद्धात इस्रायलबरोबर असल्याचा संदेश दिला आहे. अशातच, आता आणखी एक शक्तीशाली देश या युद्धात उडी घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा शक्तीशाली देश म्हणजे रशिया.
दहशतवादी संघटना हमासने रशियाशी संपर्क साधला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी २०० हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. या ओलिसांना सोडण्याबाबत रशिया आणि हमासमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. जगातल्या दोन महाशक्ती अमेरिका आणि रशियाने या युद्धात उडी घेतल्याने याचा संपूर्ण जगाला फटका बसू शकतो. इस्रायल हमास युद्धाबाबतच्या अमेरिका आणि रशियाच्या भूमिका जगाला शीतयुद्धाची आठवण करून देत आहेत.
इस्रायल-हमास युद्धाबाबत अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेने इस्रायलच्या मदतीसाठी भूमध्य सागरात युद्धनौका तैनात केल्या आहेत. या युद्धनौकांवर लढाऊ विमानंही तैनात करण्यात आली आहेत.. तर दुसऱ्या बाजूला रशियाने काळ्या समुद्रात विध्वसंक क्षेपणास्रं आणि लढाऊ विमानं तैनात केली आहेत. ही परिस्थिती पाहता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा >> इस्रायल-हमास युद्धावर जो बायडेन यांचं मोठं वक्तव्य, पुतिन यांच्यावर आरोप करत म्हणाले…
रशियाच्या इस्रायलमधील राजदूतांच्या हवाल्याने दी टाईम्स ऑफ इस्रायल या वृत्तपत्राने म्हटलं आहे की, रशिया हमासच्या संपर्कात आहे. सर्व ओलिसांची सुटका करणं हे या चर्चेमागचं मुख्य उद्दीष्ट आहे. रशियाचे राजदूत अॅनाटोली विक्टोरोव्ह यांनी म्हटलं आहे की, दहशतवादी संघटनेने २०० ते २५० नागरिकांना गाझा पट्टीत ओलीस ठेवलं आहे. त्यांच्या सुटकेसाठी मॉस्कोचे प्रयत्न सुरू असून हमासशी यासंदर्भात चर्चा सुरू आहे.