सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबत केंद्रीय संस्थेचा अंदाज
चालू आर्थिक वर्षांतील देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा दशकातील सर्वात खालच्या पातळीवर अंदाजित करून सरकारने तमाम अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक स्थिती स्पष्ट केली आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या अग्रिम अंदाजानुसार २०१२-१३ मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) अवघे ५ टक्के राहण्याची भीतीसदृश शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दशकातील सर्वात कमी विकास दराची नोंद यापूर्वी २००२-०३ मध्ये केली गेली होती. या वेळी सकल राष्ट्रीय उत्पादन अवघे ४ टक्के होते. त्यानंतर हा दर ६ टक्क्यांच्या वरच राहिला आहे. असे असताना २००६-०७ मध्ये विकास दर गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक अशा ९.६ टक्क्यांवर होता. एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत विकास दर ५.४ टक्के राहिला आहे.
निर्मिती, कृषी आणि सेवा क्षेत्राची सध्याची संथ वाढ यंदाच्या घसरत्या दराला कारणीभूत असल्याचे केंद्रीय सांख्यिकी संघटनेने जाहीर केलेल्या अंदाजात म्हटले गेले आहे, तर हा अंदाज चिंताजनक असून अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी निर्णायक पावले उचलण्याचा सरकारचा प्रयत्न कायम आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
संघटनेने अवघ्या दीड महिन्यात संपणाऱ्या आर्थिक वर्षांअखेर देशाची कृषी प्रगतीही निम्म्यावर अभिप्रेत केली आहे. २०११-१२ मध्ये कृषी क्षेत्राच्या ३.६ टक्के वाढीचा दर यंदाच्या वर्षांत १.८ टक्के असेल, असे नमूद केले आहे, तर निर्मिती क्षेत्राची वाढही आधीच्या २.७ टक्क्यांऐवजी केवळ १.९ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
वित्त, विमा, बांधकाम आदींचा समावेश असलेले सेवा क्षेत्रही यंदा वर्षभरापूर्वीच्या ११.७ टक्क्यांच्या तुलनेत एकेरी आकडय़ात ८.६ टक्क्याने विस्तारेल, असा नवा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.