काही वर्षांपूर्वी चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या गीता या मुकबधिर मुलीला अखेर २६ ऑक्टोबरला (सोमवारी) पाकिस्तानातून भारतात आणण्यात येणार आहे. अलीकडच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील कथानक फक्त उलटय़ा पद्धतीने गीताच्या बाबतीत प्रत्यक्ष घडले आहे. गीताच्या परतीसाठी सर्व सोपस्कार भारत व पाकिस्तान यांनी पूर्ण केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तिच्या समवेत एधी धर्मादाय संस्थेचे पाच अधिकारी येणार आहेत. त्यांनी तिचा पाकिस्तानात सांभाळ केला होता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, २६ ऑक्टोबरला गीता हिला परत आणले जाणार आहे. तिच्याबरोबरच्या पाचजणांनाही पाहुण्यांचा दर्जा दिला जाणार आहे. गीता हिने तिचे वडील, सावत्र आई व मुलांना छायाचित्रातून ओळखले आहे. ते छायाचित्र भारतीय उच्चायुक्तालयाने इस्लामाबादला पाठवले होते. त्यातून ती बिहारची असल्याचे स्पष्ट झाले आहे. गीता सात-आठ वर्षांची असताना चुकून पाकिस्तानात गेली. ती पंधरा वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकावर समझौता एक्सप्रेसमध्ये पाकिस्तानी रेंजर्सना सापडली होती.

Story img Loader