पाकिस्तानात जवळपास एका दशकाहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर २०१५ साली भारतात परतलेली मूकी व बहिरी असलेल्या गीताची अखेर तिच्या कुटुंबियांशी भेट झाली आहे. विशेष म्हणजे गीताचे कुटुंब हे महाराष्ट्रातील आहे. गीताची तिच्या खऱ्या आईशी नुकतीच भेट झाल्याचे वृत्त पाकिस्तानमध्ये तिची देखभाल करणाऱ्या सेवाभावी संस्थेनं जाहीर केलं आहे. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांमुळे गीताला भारतात पाठवण्यात आलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एधी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे माजी प्रमुख दिवंगत अभ्दुल सत्तार एधी यांची पत्नी बिलकिस एधी यांनी गीताची नुकतीच तिच्या खऱ्या आईशी भेट झाल्याचा खुलासा केलाय. गीता आणि तिच्या आईची भेट महाराष्ट्रात झाल्याचे सांगण्यात आलं आहे. “गीता माझ्या संपर्कात होती. याच आठवड्यात माझी आणि आईची भेट झाल्याचे तिने मला सांगितले,” असं बिलकिस यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे पीटीआयशी बोलताना बिलकीस यांनी, गीताचं खरं नाव राधा वाघमारे असून तिची आई महाराष्ट्रातील नायगाव येथील असल्याची माहिती दिलाय. बिलकीस यांनी दिलेल्या माहितीनुसार गीता त्यांच्याकडे आली तेव्हा ११ ते १२ वर्षांची होती. एधी यांच्या सेवाभावी संस्थेनेच तिचा संभाळ केला आणि तिचे मूळ पालक आणि शहर शोधण्यासाठी एक दशक प्रयत्न सुरु ठेवले. लाहोर रेल्वे स्थानकात समझोता एक्स्प्रेसमध्ये एक मुलगी एकटीच बसलेली असल्याचे पाकिस्तानच्या रेंजर्सना आढळले होते. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजेच २०१५ साली याच गीताला भारतात आणण्यात आले.

बिलकीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी चूकून ट्रेनमध्ये बसून पाकिस्तानात आली. त्यांची आणि या मुलीची पहिली भेट कराचीमध्ये झाली. तेव्हा या मुलीचे पालन पोषण करणारं कोणीच नव्हतं. अखेर त्यांनी या मुलीची जबाबदारी घेत तिला लाहोरमधील आपल्या संस्थेच्या केंद्रात ठेवलं. सुरुवातील बिलकीस यांनी या मुलीचे नाव फातिमा ठेवलं होतं. मात्र ती हिंदू असल्याचे समजल्यानंतर तिचं नाव गीता ठेवण्यात आलं. गीता भारतात परतल्यानंतरही तिच्या आई-वडीलांचा शोध घेण्यासाठी साडेचार वर्षांहून अधिक कालावधी लागला. डीएनए चाचणीच्या मदतीने तिच्या खऱ्या पालकांची ओळख पटल्याचा दावा बिलकीस यांनी केलाय. गीताच्या खऱ्या वडीलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून गीताची आई मीना यांनी दुसरं लग्न केल्याचंही बिलकीस यांनी स्पष्ट केलं आहे.

गीता भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिची भेट घेऊन पाकिस्तानात तिचा सांभाळ करणाऱ्या एधी फाउंडेशनला एक कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती. सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटामुळे गीताची ही कहाणी पुढे आली होती. भारतीय उच्चायुक्त टी.सी.ए.राघवन व त्यांच्या पत्नीने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या सांगण्यावरून गीताची भेट घेतली होती. या भेटीनंतरच गीताला परत आणण्याची सुत्रं वेगाने हलली आणि ती भारतात परतली होती. कराची येथे विमानात बसण्यापूर्वी गीताने पाकिस्तानी लोकांचेही आभार मानले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geeta who strayed into pakistan returned in 2015 finally finds her family in maharashtra scsg