दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात वातावरण तापलेले असतानाच महिलांविषयी अनुदार उद्गार काढण्याचे सत्र सुरूच आहे. त्यात आता हरयाणाच्या मंत्र्याची भर पडली आहे. गीतिका शर्मा या २३ वर्षीय हवाईसुंदरीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या गोपाल कांडा या माजी मंत्र्याचे कौतुक करताना हरयाणाचे कामगारमंत्री शिवचरचण शर्मा यांनी गीतिका शर्माचा उल्लेख कांडा यांची ‘नोकर’ असा केला.
गीतिकाच्या आत्महत्येप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या गोपाल कांडाच्या वाढदिवसानिमित्त २९ डिसेंबरला येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंत्री शर्मा यांनी कांडावर स्तुतिसुमने उधळताना गीतिका शर्मा प्रकरण हे किरकोळ प्रकरण असून गोपाल लवकरच दोषमुक्त होईल असे स्पष्ट केले. तसेच गीतिकाचा उल्लेख त्यांनी ‘नोकर’ असा केला. गोपालने गीतिकाची ‘नोकर’ म्हणून निवड चुकीनेच केली त्यामुळे तो फसला असेही हे मंत्रिमहोदय म्हणाले.
या वक्तव्यानंतर हरयाणात गदारोळ उडाला. गीतिकाच्या भावाने मंत्रिमहोदयांकडून माफीची मागणी केली आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाने मंत्र्याला घरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली आहे. टीकेनंतर शर्मा यांनी नरमाई स्वीकारत आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेल्याचे नेहमीचेच घूमजाव केले. गीतिका शर्मा प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयात कांडा दोषी आढळले तर त्यांना शिक्षा होईलच असे स्पष्ट केले.
गीतिका प्रकरणी अनुदार उद्गार काढल्याच्या पाश्र्वभूमीवर अलीकडच्या काळात जाहीरपणे अनुदार उद्गार काढणाऱ्यांची जंत्री अशी..
संजय निरुपम : अभिनेत्री व भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांच्यावर टीका करताना : तुम्ही आतापर्यंत टीव्हीवर ठुमके लावायच्यात, आता तुम्ही राजकीय विश्लेषक बनलात. तुम्हाला राजकारणाचा काय अनुभव?
दिग्विजयसिंह : भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन चळवळीचे नेते आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना : अरविंद केजरीवाल हे राखी सावंतसारखे आहेत. या दोघांनाही सातत्याने ‘एक्स्पोझ’ करायचे असते पण त्यात काही तथ्य नसते..
राष्ट्रपतीपुत्र अभिजित मुखर्जी : दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या महिलांवर टीका करताना : या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला विद्यार्थिनी वाटत नाहीत. त्या ओठांना लिपस्टिक लावून तसेच नटूनथटून आंदोलनाला आलेल्या दिसतात.
रॉबर्ट वढेरा : अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना : भ्रष्टाचारविरोधात आंदोलन करणारे हे लोक म्हणजे खुज्या देशातले खुजे लोक आहेत. (मँगो पीपल इन बनाना रिपब्लिक)
बनवारी सिंघल (भाजप आमदार, अलवर, राजस्थान) : मुलींची पुरुषांकडून होणारी छेडछाड तसेच त्यांना मुक्तपणे वावरता यावे यासाठी अलवार जिल्ह्य़ातील शाळांमध्ये विद्यार्थिनींना स्कर्ट घालण्यास बंदी घालावी.
गीतिका ही कांडाची ‘नोकर’
दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात वातावरण तापलेले असतानाच महिलांविषयी अनुदार उद्गार काढण्याचे सत्र सुरूच आहे. त्यात आता हरयाणाच्या मंत्र्याची भर पडली आहे.
First published on: 02-01-2013 at 03:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geetika is kandas servent