नवी दिल्ली : काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास जेमतेम तीन दिवस उरले असताना, शशी थरूर यांच्याविरोधात कोण रिंगणात उरणार, याबाबत सोमवारी दिवसभर अनिश्चिततेचे वातावरण होते. सोनिया गांधी यांच्या निर्णयाची प्रतीक्षा असून त्यानंतरच संभाव्य उमेदवार निश्चित केला जाईल. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गांधी कुटुंबाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यामुळे सोनिया गांधी त्यांच्यावर कमालीच्या नाराज झाल्याने सांगितले जात असले तरी, गेहलोत पुन्हा दिल्लीला येऊन सोनियांची भेट घेणार आहेत. आपल्या निष्ठावंतांनी चूक केल्याचे गेहलोतांचे म्हणणे असून गांधी कुटुंबाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेहलोतांशी चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी पक्षाध्यक्ष पदाच्या उमेदवारासंदर्भात अंतिम निर्णय घेतील असे समजते. त्यामुळे गेहलोतांच्या उमेदवारीची शक्यता अजूनही पूर्णत: संपुष्टात आलेली नाही.

हेही वाचा >>> ‘पीएफआय’च्या आणखी १७० जणांना अटक; दहशतवादी कारवायांना पाठबळाचा आरोप: महाराष्ट्रासह सात राज्यांत कारवाई

हेही वाचा >>> भारत-जपान मैत्रीत आबे यांचे मोठे योगदान; पंतप्रधान मोदी यांची श्रद्धांजली; अंत्यसंस्कारांस जगभरातील नेते

मात्र, सोनियांनी विश्वासू ए. के. अण्टनी यांना दिल्लीत येण्यास सांगितले आहे. गेहलोत यांच्याशी अण्टनी, मल्लिकार्जुन खरगे, कमलनाथ, के. सी. वेणूगोपाल आदी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा होण्याची शक्यता असून राजस्थानमधील सत्तासंघर्षांवरही तोडगा काढला जाणार आहे. त्यासंदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी सचिन पायलट हेही सोमवारी दिल्लीत येऊन दाखल झाले. त्यांनी सोनियांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. पण, रात्री उशिरापर्यंत तरी त्यांची भेट झालेली नव्हती.

हेही वाचा >>> निर्णय निवडणूक आयोगाच्या कोर्टात; पक्षचिन्हाबाबत सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

गेहलोत यांच्या उमेदवारीची शक्यता कमी असल्याने सोमवारी दिवसभर दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक आदी ज्येष्ठ नेत्यांच्या नावांची चर्चा रंगली होती. कमलनाथ यांच्या नावाचाही विचार केला गेला होता, मात्र, त्यांनी मध्य प्रदेशमध्येच राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या निवडणूक विभागाचे प्रमुख मधुसदन मिस्त्री यांच्याकडून पवन बन्सल यांनी उमेदवारी अर्जाचे दोन संच घेतल्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा केली जात होती. मात्र, बन्सल यांनी उमेदवारीची शक्यता फेटाळून लावली. उमेदवारी अर्ज कोणीही भरू शकतो व ऐनवेळी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी अर्जाचे संच घेतल्याचे बन्सल यांनी स्पष्ट केले. बन्सल यांनी अर्ज भरून तयार केल्यामुळे शेवटच्या क्षणी सोनिया गांधींकडून उमेदवाराचे नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> ‘वैद्यकीय शिक्षण सुधारणांच्या नावे काँग्रेसने पैसे कमावले’

बंडखोर गटातील नेते शशी थरूर यांनी निवडणूक लढवणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. अखेरच्या दिवशी, ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता थरूर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे मिस्त्री यांनी सांगितले. गेहलोत यांच्या उमेदवारीसंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे मिस्त्री म्हणणे होते. मिस्त्री यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची भेट घेऊन प्रदेश काँग्रेसच्या प्रतिनिधींची यादी सुपूर्द केली. पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हे प्रतिनिधी ‘मतदार’ आहेत.

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर?

पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक होईपर्यंत राजस्थानमधील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर अशोक गेहलोत यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सचिन पायलट यांना आमदारांचा पुरेसा पाठिंबा नसल्याने तसेच, गेहलोत यांच्या समर्थक आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई केल्यास राजस्थानातील काँग्रेसचे सरकार कोसळण्याचा धोका असल्याने दिल्लीतून सबुरी दाखवली जात आहे.

Story img Loader