भारतात आतापर्यंत एकूण १५८ कोटी करोना विरोधी लसीचे डोस देण्यात आलेत. यात पहिला डोस, दोन डोस आणि बुस्टर डोसचा समावेश आहे. १८ जानेवारीपर्यंत भारतात १००० पुरुषांमागे ९५४ स्त्रियांनी लस घेतलीय. भारताचं लिंग गुणोत्तर १००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया असं आहे. त्यामुळे एकूण भारताचा विचार केला तर लसीकरणात अधिक स्त्रियांनी लस घेतलीय. मात्र, भारतातील प्रमुख मेट्रो शहरांचा विचार केल्यास निराशाजनक चित्र आहे. यात मुंबईची कामगिरी सर्वात वाईट आहे. याबाबत इंडियन एक्स्प्रेसने विशेष वृत्तांत दिलाय.

१८ जानेवारीपर्यंत मुंबईत एकूण १ कोटी १० लाख पुरुषांनी लसीकरण घेतलंय, मात्र स्त्रियांमध्ये लस घेणाऱ्यांची संख्या ७६ लाख ९८ हजार इतकी आहे. म्हणजेच मुंबईत स्त्री पुरुषांच्या लसीकरणाच्या प्रमाणात मोठं अंतर पाहायला मिळालं आहे. हे प्रमाण १००० पुरुषांमागे केवळ ६९४ स्त्रियांनी लसीकरण घेतल्याचं आहे. हे प्रमाण मुंबईच्या लिंगगुणोत्तरापेक्षाही कमी आहे. सध्या मुंबईचं लिंगगुणोत्तर १००० पुरुषांमागे ८३२ स्त्रिया असं आहे.

दिल्लीत लसीकरणातील स्त्री-पुरुषांचं प्रमाण किती?

दिल्लीत आतापर्यंत एकूण १ कोटी ६४ लाख पुरुषांनी लस घेतली. दुसरीकडे लस घेणाऱ्या स्त्रियांची संख्या १ कोटी २२ लाख आहे. हे प्रमाण १००० पुरुषांमागे ७४२ इतकं आहे. दिल्लीत लिंगगुणोत्तर १००० पुरुष : ८६८ स्त्रिया असं आहे. बंगळुरू आणि चेन्नईचंची स्थितीही अशीच आहे. ती आकडेवारी चार्टमध्ये पाहता येईल.

‘या’ राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा लस घेणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण अधिक

भारतातील ३६ पैकी केवळ ९ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या लसीकरणाचं प्रमाण अधिक आहे. यात आंध्रप्रदेश, बिहार, आसाम, छत्तीसगड, केरळ, ओडिशा, पाँडिचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.

Story img Loader