देशातील प्रसारमाध्यमे ‘प्रेस्टिट्यूट’ (Press-titute) असल्याचे वादग्रस्त ट्विट करून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. सिंग यांच्या विधानावर देशभरातून टीका होत असून सर्व राजकीय पक्षांनी सिंग यांच्या विधानाचा निषेध केला आहे. पक्षपाती आणि पूर्वग्रहदूषितपणे वार्तांकन करणाऱया प्रेस्टिट्यूटकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवणार, असे ट्विट सिंग यांनी केले आहे. येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याच्या मोहिमेवर असलेल्या सिंग यांनी ‘ पाकिस्तान दूतावासाच्या भेटीत जो थरार होता, तो या मोहिमेत नाही’, असे वक्तव्य सिंग यांनी केले होते. या वक्तव्यावरून सर्व माध्यमांमधून त्यांच्यावर टीका सुरू झाली. त्यामुळे सिंग यांनी प्रसार माध्यमांना प्रेस्टिट्यूट म्हणजेच प्रोस्टिट्यूट(वेश्या) या शब्दाचा आधार घेत टीका केली.