पीटीआय, जम्मू
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नागरिक त्यांच्या समस्या-व्यथा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी येत्या मार्चमध्ये जिनेव्हा येथे परिषद आयोजित करणार आहेत, अशी माहिती भाजपचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे अखेरचे डोगरा शासक महाराजा हरी सिंह यांचे नातू अजातशत्रू सिंह यांनी दिली.
लंडनहून परतल्यावर सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी तेथे पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांच्या मोठय़ा प्रमाणात गाठीभेटी घेतल्या. अजातशत्रू सिंह यांनी २६ ऑक्टोबर रोजी लंडनमध्ये ब्रिटिश प्रतिनिधीगृह ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये विशेष निमंत्रित म्हणून जम्मू-काश्मीरचा विलीनीकरण दिन साजरा केला होता.सिंह यांनी सांगितले, की लंडनमध्ये भेटलेले बहुतेक ‘पीओके’ प्रतिनिधी हे परदेशी भूमीवर वास्तव्यास आहेत. आगामी परिषदेची सकारात्मक निष्पत्ती होईल, अशी आशा संबंधितांना वाटते. पाकव्याप्त काश्मीरचे नागरिक आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या व्यथा-वेदना-समस्यांना वाचा फोडण्यासाठी ही परिषद आयोजित करत आहेत.
हेही वाचा >>>मृत्यू, काहीजण बेशुद्ध तर अनेकजण जखमी, सुरत रेल्वेस्थानकावर धक्कादायक प्रकार
जीनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांचे कार्यालय असल्याने येथे ही परिषद आयोजित केली जात आहे. ते म्हणाले की, विलीनीकरण दिनाच्या उत्सवादरम्यान एक गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. काश्मिरी पंडितही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी ३० वर्षांपूर्वी काश्मीर खोऱ्यातून त्यांना बळजबरीमुळे कराव्या लागलेल्या स्थलांतरावर एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.