GEMCOVAC – OM ही भारतीय बनावटीची ओमायक्रॉन व्हायरसविरोधातील बुस्टर लस आता खासगी रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. पुण्यातील जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने ही लस उत्पादित केली असून ही लस प्रति डोस २ हजार २९२ रुपयांना विकली जाणार आहे.
ही जगातील पहिली इंट्राडर्मल सुईमुक्त लस आहे, असं कंपनीचे सीईओ संजय सिंग यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी mRNA बुस्टल लस लॉन्च केली असून या लसीला नुकतीच ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडियाकडून आपत्कालीन वापरासाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे. करोना भारतातून अद्यापही पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे आम्ही हाय अलर्टवर आहोत. आमच्याकडे सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीद्वारे GEMCOVAC – OM चे १२ लाख डोस मंजूर झाले आहेत, अशी माहिती सिंग यांनी दिली.
डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (DBT) आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC) यांच्या निधीच्या मदतीने जेनोव्हाने स्वदेशी प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील पहिली mRNA लस विकसित केली आहे. काही दिवसांपूर्वी या लसीला इमर्जन्सी युज ऑथोरायझेशन (EUA) साठी ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे.
GEMCOVAC-OM ही सरकारच्या आत्मनिर्भर भारत ३.० पॅकेज अंतर्गत DBT आणि BIRAC द्वारे राबविण्यात आलेल्या मिशन कोविड सुरक्षाच्या मदतीने विकसित केलेली पाचवी लस आहे. “या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही भारतात लस विकासाची गती वाढवू शकतो. भविष्यात जलद लस विकास कार्यक्रमाद्वारे आम्ही नवीन लस आणण्यासाठी लागणारा वेळ आणखी कमी करू शकतो”, असं जेनेव्हाचे सीईओंनी स्पष्ट केलं.
या लसीचा प्रभाव लक्षात घेता अनेक परदेशी कंपन्यांनीही या लसीची मागणी करायला सुरुवात केली आहे. पीफायजर आणि मॉर्डनासारख्या लसी ऋण ८० अंश सेल्सिअस तापमानाता ठेवणे गरजेचे असताना Gemcovac-OM या लसीसाठी २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात ठेवणे गरजेचे आहे.