मंगळाच्या पृष्ठभागावर प्राचीन काळात एकमेकांशी जोडणारी पाण्याची तळी होती. त्यातील पाच तळ्यांमध्ये जीवसृष्टीस आवश्यक असलेली खनिजेही होती हे सिद्ध करणारे भूगर्भशास्त्रीय पुरावे मिळाले असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. नेदरलँडसमधील उत्रेख्त विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, आताच्या काळात मंगळाची पृष्ठभूमी कोरडी वाटत असली तरी तेथे पूर्वी पाणी होते याच्या खुणा सापडल्या आहेत.
गेल्या वर्षी युरोपीय अवकाश संस्थेच्या मार्स एक्स्प्रेस मोहिमेत मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा साठा सापडला होता. जर्नल ऑफ जिओफिजिकल रीसर्च- प्लॅनेटस या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार प्राचीन काळात मंगळावर आताच्या प्रारूपांनी अंदाज केल्यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी होते. त्याकाळात मंगळावर पाणी होते नंतर मंगळावरचे वातावरण बदलत गेले त्यामुळे पाणी पृष्ठभागाच्या तळाशी गेले असे उत्रेख्त विद्यापीठाचे फ्रान्सेस्को सॅलेस यांचे म्हणणे आहे. आमच्या अभ्यासात मंगळाच्या पृष्ठभागाखाली मोठय़ा प्रमाणात पाणी असल्याचे भूगर्भशास्त्रीय पुरावे मिळाले आहेत.
संशोधनात काय ?
* वैज्ञानिकांनी यात मंगळाच्या उत्तर गोलार्धातील २४ खोल विवरांचा अभ्यास केला. त्यात सागरी पातळीच्या ४००० मीटर खोलीवर पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्या विवरांमध्ये पाण्याचे अस्तित्व दाखवणाऱ्या खुणा मिळाल्या आहेत.
* अनेक विवरांचे गुणधर्म चार ते साडेचार मीटर खोलीवर वेगळे असून तेथे एकेकाळी पाणी होते. नंतर ते नष्ट झाले.
* गडद त्रिभुज प्रदेश, विवरांच्या भिंतीवरील ओरखडे, पाण्याची पातळी वाढून कमी झाल्याच्या खुणा सापडल्या आहेत. तीन ते चार अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर महासागर असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
* साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी तेथे तळीही होती, त्यांचा व महासागराचा संबंध होता. मंगळावरील पाच विवरात जीवसृष्टीसाठी उपयुक्त असणाऱ्या काबरेनेट व सिलिकेटसारख्या खनिजांचे पुरावे मिळाले आहेत.
* मंगळावरील कुठले पृष्ठभाग वस्तीस योग्य आहे हे ठरवण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे आहे असे युरोपीय स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस प्रकल्पाचे वैज्ञानिक दिमित्री टिटोव यांनी सांगितले.