जर्मनीची आर्थिक राजधानी असणाऱ्या फ्रँकफर्ट शहरातील कनव्हेंशन सेंटरजवळ सापडलेला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ५०० किलोग्राम वजनाचा बॉम्ब शुक्रवारी निकामी करण्यात आला. येथील अग्निशामन दलाने हा बॉम्ब निकामी करण्याआधी शहरामधील दोन हजार ७०० जणांना सुरक्षित स्थळी जाण्यासंबंधित निर्देश जारी केले होते. याबद्दलचे वृत्त असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

मंगळवारी फ्रँकफर्ट येथील कनव्हेंशन सेंटरजवळ खोदकाम सुरु असतानाच हा ५०० किलो (एक हजार १०० पाऊण्ड) वजनाचा बॉम्ब सापडला होता. त्यानंतर पोलिसांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बॉम्ब सापडलेला परिसर रिकामा करुन तो प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला. शुक्रवारी या भागामधील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आली. यामध्य् प्रामुख्याने बस आणि ट्रेनचा समावेश होता. या भागात असणारे फ्रँकफर्ट प्राणी संग्रहायलही बंद ठेवण्यात आलं होतं. या भागातील काही रुग्णांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होत सुरक्षेच्या कारणास्तव बॉम्ब सापडलेल्या परिसराच्या आजूबाजूला राहणाऱ्या दोन हजार ७०० जणांना सुरक्षित स्थळी जाण्यासंदर्भातील सूचना यंत्रणांनी दिल्या. त्यानंतरच हा अमेरिकन बनावटीचा बॉम्ब निकामी करण्यात आला. अगदी नियोजित पद्धतीने बॉम्ब निकामी करण्यात यश आल्याची माहिती सरकारी यंत्रणांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

जर्मनीमध्ये अशाप्रकारे खोदकाम करताना बॉम्ब सापडणे दूर्मिळ गोष्ट नाही. आजही दुसरे महायुद्ध संपून ७५ वर्षे उलटल्यानंतरही जर्मनीमध्ये अशाप्रकारे बॉम्ब सापडतात. २०१७ साली सप्टेंबर महिन्यामध्ये सापडलेला एक हजार ६०० किलो वजनाचा बॉम्ब सापडला होता. हा बॉम्ब निकामी करण्याआधी सुरक्षेचा उपाय म्हणून ६५ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी लवण्यात आलं होतं.

Story img Loader