German companies hiring private detectives: कामापासून सुट्टी मिळण्यासाठी आजारपणाचे कारण देणे, ही सामान्य अशी बाब आहे. अनेकदा कर्मचारी सुट्टी मिळविण्यासाठी आजारपणाचे कारण देत असतात. पण ही आजारपणाची सुट्टी जर्मनीसारख्या देशाची डोकेदुखी ठरली आहे. जर्मनी सध्या आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. या आव्हानातून सावरण्यासाठी आता खासगी कंपन्या कर्मचाऱ्यांच्या आजारपणाच्या सुट्ट्याची सत्यता जाणून घेण्यासाठी गुप्तहेरांची नेमणूक करणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आजाराचे कारण सांगून दीर्घकालीन सुट्ट्या टाकल्या आहेत. त्यांची गुप्तहेर एजन्सीकडून चौकशी केली जाणार आहे. मात्र या निर्णयावर आता जगभरातून टीका होत आहे. विशेषतः चीनमधील सोशल मीडियावर याची अधिक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
जर्मनीमधील फ्रँकफर्ट शहरात असलेल्या लेंट्झ ग्रुपला खासगी कंपन्याच्या मागणीचा चांगलाच लाभ झाला आहे. लेंट्झ ग्रुपचे संस्थापक मार्कस लेंट्झ यांनी एएफपीला माहिती देताना सांगितले की, आमची कंपनी अशाप्रकारच्या १२०० केसेस वर्षभरात पाहत आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अशी प्रकरणे येण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे.
जर्मनीची राष्ट्रीय सांख्यिकी संस्था ‘डेस्टॅटिस’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, जर्मनीमधील कर्मचाऱ्यांचे सिक लिव्ह मागण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२१ साली सिक लिव्हचे प्रमाण प्रति कर्मचारी ११.१ (दिवस) एवढे होते, ते आता वाढून १५.१ (दिवस) एवढे झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे देशाच्या जीडीपीची २०२३ मध्ये ०.८ टक्क्याने घसरण झाली.
जर्मनीमधील आघाडीची आरोग्य विमा कंपनी ‘टीके’नेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कंपनीच्या मतानुसार, २०२४ च्या पहिल्या नऊ महिन्यात कर्मचाऱ्यांनी सरासरी १४.१३ दिवस आजारपणाची सुट्टी घेतली. तर OECD डेटाच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये आजारपणामुळे जर्मन कर्मचाऱ्यांनी ६.८ टक्के कामाचे तास वाया घालवले. इतर युरोपियन देश जसे की, फ्रान्स, इटली आणि स्पेन यांच्यापेक्षा हे प्रमाण अधिक होते.
करोना महामारीच्या काळात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या धोरणात शिथिलता आणल्यानंतर आजारपणाची सुट्टी टाकण्यात लक्षणीय वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नव्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांना साधी लक्षणे दिसली तरी आजारपणाची सुट्टी घेण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अगदी फोनवरही उपलब्ध होत आहे. महामारीच्या काळात लोकांच्या सुविधेसाठी ही व्यवस्था उभी केली होती. मात्र आता त्याचा गैरवापर वाढला असून सुट्टी मिळविण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
जर्मनीतील कर्मचारी कायदे काय सांगतात?
जर्मनीतील कामगार कायद्यानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षात सहा आठवड्यांची भरपगारी आजारपणाची सुट्टी मिळते. चार आठवड्याचा काळ लोटल्यानंतर विम्याचाही लाभ मिळतो. मात्र कर्मचाऱ्यांच्या सलग सुट्ट्यांमुळे कंपन्यावरील आर्थिक भार वाढू लागला आहे. त्यामुळेत त्यांनी आता खासगी गुप्तहेरांना नेमण्यास सुरुवात केली आहे.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात गुप्तहेर लेंट्झ यांची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ते म्हणतात, “खासगी कंपन्या आता सहन करण्यापलीकडे पोहोचल्या आहेत. जर एखाद्या कर्मचाऱ्याने वर्षाला ३०, ४० किंवा कधी कधी १०० दिवस आजारपणाची सुट्टी घेतली तर कंपनीला तर भुर्दंड बसणारच ना.”