सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध केल्याबद्दल जर्मनीच्या विद्यार्थ्याला भारत सोडण्यास भाग पाडल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आयआयटी मद्रासमध्ये शिक्षण घेणारा जॅकब सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधातील आंदोलनात सहभागी झाला होता. आंदोलनातील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. यानंतर लगेचच त्याला भारत सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला. जॅकबने सीएए आणि एनआरसीची नाझी राजवटीशी तुलना केली होती.

सोमवारी रात्री भारत सोडून जाण्याआधी चेन्नई विमानतळावर असताना इंडियन एक्स्प्रेसने त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितल्यानुसार, परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाकडून (एफआरआरओ) आपल्याला भारत सोडून जाण्याचा आदेश मिळाला. जॅकब गेल्या काही दिवसांपासून बंगळुरुत होता. एका क्रिडा स्पर्धेत तो सहभागी झाला होता. यावेळी आपल्याला एफआरआरओकडून पहिला मेल मिळाला असल्याचं जॅकबने सांगितलं आहे.

“मी सोमवारी सकाळी चेन्नईत पोहोचलो तेव्हा माझ्या कोर्स को-ऑर्डिनेटरने मला तात्काळ इमिग्रेशन अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितलं. मी भेटण्यासाठी पोहोचलो असता त्यांनी भारतात वास्तव्य करण्यासाठी परवानगी देण्यामध्ये काही प्रशासकीय अडचणी येत असल्याचं सांगितलं. मी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर माझ्या वास्तव्यासंबंधी काहीही अडचण नसल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी मला माझं राजकारण आणि आवडींसंबंधी विचारलं. ही अत्यंत मैत्रीपूर्ण चर्चा होती. त्यांनी मला सीएए आणि त्याच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासंबंधी विचारलं. एकूण तीन अधिकारी उपस्थित होते. यामधील एकच अधिकारी मला सर्व प्रश्न विचारत होता. चर्चा संपली असता त्यांनी विद्यार्थी व्हिसा नियमांचं उल्लंघन केलं असल्याने तुम्हाला तात्काळ भारत सोडून जावं लागेल असं सांगितलं. मी त्यांच्याकडे लिखित पत्राची मागणी केली असता त्यांनी माझा पासपोर्ट माझ्याकडे सोपवला आणि निघून जाण्यास सांगितलं. तुम्हाला पत्र मिळेल असं सांगण्यात आलं, पण ते मिळालंच नाही. यानंतर मी लगेच आयआयटी कॅम्पसमध्ये गेले, तिकीट बूक केलं आणि माझं सामान पॅक करुन विमानतळाकडे रवाना झालो,” असं जॅकबने सांगितलं आहे.

“मला प्राध्यापकांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्यांनी मला तुम्ही उद्या निघू शकता असं सुचवलं. पण उद्या ख्रिसमस असल्याने मी आजच निघायचं ठरवलं,” अशी माहिती जॅकबने सांगितलं आहे.

“माझं आयआयटी-मद्रास कॅम्पसवर प्रेम आहे, माझं भारतावरही प्रेम आहे, पण भारतात प्रतिगामी शक्ती वाढत चालल्या असून त्याची चिंता वाटते. जर्मनीत कायदेशीर मार्गाने करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल कोणालाही देशाबाहेर काढण्यात आलेलं नाही,” अशी भावना जॅकबने व्यक्त केली आहे.

यासंबंधी आयआयटीचे संचालक तसंच इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी इंडियन एक्स्प्रेसने संपर्क साधून यासंबंधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वांनीच आपल्याला यासंबंधी काही माहिती नसल्याचा दावा केला.