हमास आणि इस्रायलमध्ये युद्धाची ठिणगी पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी एका तरुणीचं अपहरण करून तिची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली होती. एवढंच नव्हे तर काहीजण संबंधित तरुणीच्या मृतदेहावर थुंकले होते. क्रूरतेचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर जगभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
संबंधित २३ वर्षीय जर्मन तरुणीचं नाव शनी निकोल लोऊक असून ती एक ‘टॅटू आर्टिस्ट’ होती. मृत शनी लोऊकबद्दल इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष यित्झचॅक हर्झोग यांनी सोमवारी मोठा दावा केला. हमासच्या दहशतवाद्यांनी तिचं शिर धडापासून वेगळं केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायली राष्ट्राध्यक्षांनी केला.
जर्मन वृत्तपत्र ‘डेली बिल्ड’शी संवाद साधताना इस्रायली राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी सांगितलं, “मला हे सांगण्यास अत्यंत दु:ख होतंय की, शनी निकोल लोऊकची हत्या झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. इस्रायली पथकाला तिची कवटी सापडली आहे. याचा अर्थ हमासच्या रानटी दहशतवाद्यांनी तिचं शिर धडावेगळं केलं होतं.”
हेही वाचा- “मला मारू नका”; इस्रायली विद्यार्थिनीचं हमासकडून अपहरण, थरकाप उडवणारा VIDEO
इस्रायली राष्ट्राध्यक्षांनी पुढे असंही सांगितलं की, पीडित तरुणीची ओळख पटवण्यास इतका वेळ लागला कारण हमासने लोकांवर क्रूरपणे अत्याचार केले आहेत. त्यांनी अनेकांना जाळलं किंवा त्यांचे तुकडे केले आहेत. लोऊकचे किबुत्झ रेइम येथील नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमधून अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी तिला जबरदस्तीने गाझा पट्टीत नेलं होतं.