Germany Needs Indian Workforce: जर्मनीत सध्या वयोवृद्धांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कामगारांची कमतरता निर्माण झाली आहे. जर्मनीला कुशल कामगार मिळावे, यासाठी जर्मन चॅन्सेलर स्कोल्झ ओलाफ यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कामगार व मजुरांची कमतरता भरून काढण्यासाठी जर्मनीने भारतीय नागरिकांसाठी वार्षिक व्हिसा कोटा २०,००० हून ९०,००० हजारांपर्यंत वाढवला आहे. यापूर्वी जर्मनीत दरवर्षी फक्त २०,००० हजार भारतीय नागरिकांना व्हिसा दिला जात होता. आता ९०,००० भारतीयांना दरवर्षी व्हिसा देण्याचा निर्णय जर्मनीने घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय तरुणांना मोठ्या संख्येने जर्मनीत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच जर्मन व्हिसाचा प्रतिक्षा कालावधीदेखील कमी करण्यात आला आहे.

जर्मनीत ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत असल्याने तिथे कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी जर्मनीला तरुण कामगारांची आवश्यकता आहे. जर्मनीत २०१४ मध्ये एकूण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या ही ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांची होती. २०३० पर्यंत जर्मनीतील ३५ टक्के लोकसंख्या ही ६० वर्षांहून अधिक वयोमान असलेल्या नागरिकांची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आतापासूनच जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांच्याकडून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाऊलं उचलली जात आहेत.

हेही वाचा : इस्रायलमध्ये बांधकाम मजूरांना मिळणार सव्वा लाख रुपये वेतन; उत्तर प्रदेश सरकारकडून जाहिरात प्रसिद्ध

जर्मनीत अभियांत्रिकी व आयटी क्षेत्रात संधी

भारतातून जर्मनीत जाणाऱ्या कामगारांना मुख्यत: आभियांत्रिकी व आयटी क्षेत्रात रोजगाराच्या संधी असतील. तसेच रुग्णसेवा, ज्येष्ठ नागरिकांची सेवा, ट्रक चालक, बालसंगोपन या क्षेत्रांमध्ये देखील रोजगार उपलब्ध होणार आहेत. जर्मनीच्या विदेश मंत्री अॅनालेना बेअरबॉक या देखील भारत दौऱ्यावर आल्या असून त्यांनी नवी दिल्लीत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “भारतात कुशल कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. आम्हाला जर्मनीमध्ये कामगारांची आवश्यकता आहे. त्यामुळे जर्मनीने घेतलेल्या निर्णयाचा फायदा हा जर्मनीसह भारताला देखील होणार आहे.” दरम्यान, जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ हे मागील दोन वर्षात तिसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत.

जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक भारतीय विद्यार्थी

जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे भारतीय आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात जर्मनीत ४९,४८३ भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यात १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे जर्मन अकॅडमीक एक्सचेंज सर्व्हिसच्या अहवालातून समोर आले आहे.

हेही वाचा : युद्धग्रस्त इस्रायलसाठी राज्यातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण ! कुशल कामगारांचा तुटवडा असल्याचे कारण

u

जर्मन भाषा येत असल्यास विविध क्षेत्रात रोजगार

जर्मनीचे कामगार मंत्री हुबेर्टस हेल म्हणाले, “जर्मनीत नोकरी करण्यासाठी जर्मन भाषा शिकणे आवश्यक आहे. जर्मन भाषा येत असल्यास विविध क्षेत्रात रोजगार मिळू शकतात. परंतु, जर्मन भाषेचे शिक्षण आमच्या देशात येऊन घेतले तर त्याचा आर्थिक फायदा जर्मनीला होईल. आयटी क्षेत्र, रुग्णसेवा व औषधे क्षेत्रात आम्हाला तातडीने कामगार हवे आहेत. जर्मन व्हिसाचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे जर्मनीत रोजगाराच्या संधी शोधणाऱ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. त्यांना सुविधा देखील दिल्या जाणार आहेत. सध्या जर्मनीत रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्यांना आरोग्य विमा, विद्यापीठात शुल्काविना शिक्षण अशा सवलती देण्यात येत आहेत ” दरम्यान, मागील वर्षी जर्मनीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये २३ हजार भारतीय कामगारांची आणखी भर पडल्याचे, जर्मन चॅन्सेलर स्कोल्झ ओलाफ यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले.

जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ हे सध्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. स्कोल्झ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी जर्मनी व भारत या देशांमध्ये विविध करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच रशिया-युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातील स्थिती व इतर जागतिक समस्यांवर जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली.