जर्मनीतल्या म्युनिक स्टेशनवर अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात अनेक लोक जखमी झाल्याची घटना घडली आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार या हल्लेखोराला पोलिसांनी अटकही केली आहे. म्युनिक स्टेशनवर अचानक गोळीबार झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. तसेच प्रवासी घाबरलेही होते. मात्र या अज्ञात हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहे असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गोळीबाराच्या या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच चार पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.
या हल्लेखोराने हल्ला का केला हे समजू शकलेले नाही, मात्र यामागे कोणतेही धार्मिक किंवा राजकीय कारण नाही असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जखमी झालेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रोज होणारी तपासणी सुरू असताना हा हल्ला झाला आहे असे पोलिसांनी म्हटले आहे. तर हल्लेखोराने महिला पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तुल हिसकावले आणि तिच्यावर गोळी झाडली, तसेच गोळीबार सुरू केला अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. आता ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोराची चौकशी करण्यात येते आहे. त्याने हा हल्ला नेमका का केला होता? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.