सीरियावरुन येत्या काळात अमेरिका आणि रशियामध्ये तणाव वाढणार असून दोन्ही देशांकडून युद्धाची भाषा सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट रशिया आणि सीरियाला मिसाईल हल्ल्याची धमकी दिली आहे. रशिया आणि सीरियाने आमच्या मिसाईल हल्ल्यासाठी तयार रहावे. आमचे बॉम्ब उत्तम आणि स्मार्ट आहेत असे ट्रम्प यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

गॅस हल्ल्यामध्ये आपल्याच लोकांना मारुन मजा बघणाऱ्या प्राण्यांना तुम्ही साथ देऊ नये असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. रशियाने केलेल्या आक्रमक भाषेला ट्रम्प यांनी सुद्धा त्याच भाषेत उत्तर दिले आहे. सीरियाच्या दिशेने अमेरिकेने मिसाईल डागले तर आम्ही ते पाडू आणि जिथून ते मिसाईल आले आहे त्या तळावर मिसाईल हल्ला करु अशी बेरुतमधील रशियन राजदूताने धमकी दिली आहे.

कधी नव्हते इतके रशियाबरोबर आमचे संबंध खराब झाले आहेत. खरंतर अस काही घडण्याची गरज नव्हती असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपुर्वी सीरियामधून आपलं सैन्य काढणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र सीरियाच्या बंडखोरांच्या रासायनिक हल्ल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलल्याचं दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियामधील निष्पाप लोकांची इतक्या निर्दयीपणे हत्या केल्याचा निषेध केला आहे. कथित हल्ल्यानंतर काही वेळानंतर ट्रम्प यांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष आसाद यांना जनावर म्हणत याची किंमत मोजावी लागले अशी धमकी दिली होते. गेल्यावर्षीदेखील अशाच प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन दिवसांच्या आत जेथून हल्ला झाला होता त्या एअरबेसवर क्षेपणास्त्र डागली होती.

Story img Loader