Rozgar Mela : देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरता केंद्र सरकारकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने आज ७१ हजार नियुक्तीपत्रे तरुणांना वाटण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना संबोधित केलं. तसंत, देशात रोजगार वाढवण्यासाठी पावलं उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
“काही वर्षांपूर्वीपर्यंत सरकारी नोकरी मिळवणं फार कठीण काम होतं. अर्ज मिळण्याकरता तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असत. त्यानंतर पोस्टाने अर्ज पाठवावा लागत असे. आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी अर्ज पोहोचला की नाही हेसुद्ध कळत नसायचं. पण आता अर्जप्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. तसंच, ग्रुप सी आणि डी पदांच्या भरतीसाठी मुलाखतीही बंद झाल्या आहेत. यामुळे भ्रष्टाचार आणि घराणेशाहीसुद्ध संपली”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. रोजगार मेळावा उपक्रमeअंतर्गत आज देशभरात ७१ हजार नियुक्ती पत्रे वाटण्यात आली, यावेळी पंतप्रधान बोलत होते.
“आजचा दिवस विशेष आहे. नऊ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी १६ मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले होते. तेव्हा पूर्ण देश उत्साह, उमंग, विश्वासाने आनंदी झाला होता. सबका साथ, सबका विश्वासच्या मंत्रासोबत पुढे जाणारा भारत विकसित भारत बणण्यासाठी प्रयत्न करत आहे:, असंही मोदी म्हणाले.
सरकारच्या योजना आणि धोरणांचे कौतुक करत मोदी म्हणाले की, “तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. भारत सरकारची प्रत्येक योजना, प्रत्येक धोरण युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहे. गेल्या नऊ वर्षांत भारत सरकारने सुमारे ३४ लख कोटी रुपये भांडवली खर्चावर खर्च केले आहेत.”
“गेल्या नऊ वर्षांत नोकऱ्यांचे स्वरुपही बदलले आहे. या बदलत्या परिस्थितीत तरुणांसाठी नवनवन क्षेत्र उद्यास आली आहेत. या नवीन क्षेत्रांना केंद्र सरकारने सातत्याने मदत केली आहे. या नऊ वर्षांत देशाने साक्ष दिली आहे. स्टार्ट अप संस्कृतीत एक नवीन क्रांती झाली आहे. नऊ वर्षांपूर्वी देशात १०० स्टार्टअप होते. आज तीच संख्या एक लाखांवर गेली आहे”, असंही मोदींनी पुढे स्पष्ट केलं.