देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असतानाच दुसरीकडे पंजाबमधील फरीदकोट येथे केंद्र सरकारने पीएम केअर्स निधीमधील पैशातून मदत म्हणून पाठवलेले व्हेंटिलेटर्स सदोष असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र आता यासंदर्भात केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. भारत सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये समोर आलेल्या बातम्यांमधील तपशीलात पूर्ण माहिती देण्यात आलेली नसल्याचं म्हटलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

केंद्र सरकारने पीएम केअर्सअंतर्गत पुरवलेले काही व्हेंटिलेटर्स फरीदकोटमधील जीजीएस मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पडून असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या व्हेंटिलेटर्समध्ये तांत्रिक अडचणी असून निर्मात्या कंपनीने वस्तू खरेदी करण्यात आल्यानंतर देण्यात येणारी सेवा नीट दिली नसल्याचं बातम्यांमध्ये म्हटलं आहे. मात्र या बातम्यांमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (बीईएल) ८८ व्हेंटिलेटर्स पुरवले आहेत. तसेच पाच व्हेंटिलेटर्स एजीव्हीएने पुरवले आहेत. या व्हेटिलेटर्सचं इन्सटॉलेशन आणि कमिशनिंग झाल्यानंतर हे व्हेंलिटेर्स आम्ही स्वीकारत आहोत असं पत्र रुग्णालय प्रशासनाने दिलं होतं, अशी माहिती केंद्र सरकारने दिलीय.

आम्हाला बीईएलने दिलेल्या माहितीनुसार फरीदकोटमधील जीजीएएमसीएच रुग्णालयातील व्हेंटिलेटर्स सदोष नाहीत. या व्हेंटिलेटर्ससंदर्भात जेव्हा जेव्हा तक्रारी आल्या तेव्हा कंपनीच्या इंजिनियर्सने या मेडिकल कॉलेजला भेट देऊन आवश्यक ती दुरुस्ती केलीय, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

बीईएलच्या इंजिनियर्सने फरीदकोटमधील जीजीएएमसीएच रुग्णालयाला १२ मे रोजी भेट दिली होती. त्यांनी पाच व्हेंटिलेटर्समधील काही तांत्रिक बिघाड दुरुस्त करुन ते सुरु करुन दिले. व्हेंटिलेटर्सच्या वापरासंदर्भात त्यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना माहिती दिली, असं सरकारने म्हटलं आहे.

बाबा फरीद विद्यापीठाचे कुलगुरु असणाऱ्या राज बहादूर यांनी आता आमच्याकडे ४२ व्हेंटिलेटर्स असल्याची माहिती एनडीटीव्हीशी बोलताना दिली आहे. आम्हाला पीएम केअर्सकडून ८२ व्हेंटिलेटर्स मिळाले होते. मात्र त्यापैकी ६२ व्हेंटिलेटर्स सदोष आहेत. पंजाबमधील या व्हेंटिलेटर्स विषयावरुन राज्य विरुद्ध केंद्र असा वाद सुरु झाला असून दोन्हीकडून केवळ पत्रव्यवहार सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. या व्हेंटिलेटर्सच्या विषयावरुन केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर बेजबाबदारपणाचा आरोप करताना दिसत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये गोंधळच गोंधळ

उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्हा रुग्णालयांमध्ये पीएम केअर्स अंतर्गत देण्यात आलेले अनेक व्हेंटिलेटर्स न वापरताच धूळ खात पडून आहेत. करोना कालावधीमध्ये व्हेंटिलेटर्सची सर्वाधिक गरज असतानाच शेकडो व्हेंटिलेटर्स रुग्णालयामध्ये न वापरताच ठेवल्याचं चित्र दिसत आहे. हे व्हेंटिलेटर्स अनेक रुग्णालयांच्या स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आले आहेत.

७५ व्हेंटिलेटर्स वर्षभरापासून धूळ खात

फिरोजाबाद मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलेले ७५ व्हेंटिलेटर्स वर्षभरापासून धूळ खात पडले आहेत. १९० व्हेंटिलेटर्स पीएम केअर्सच्या निधीमधून विकत घेण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३९ व्हेंटिलेटर्स वापरण्यात आले. रुग्णालयातील मुख्य आरोग्य अधिकारी असणाऱ्या अलोक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार ५० व्हेंटिलेटर्स लखनऊला पाठवण्यात आले आहेत. १५ व्हेंटिलेटर्स अलहाबाद तर १० आग्रा येथील रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.

बलियामध्ये व्हेंटिलेटर्स आहेत पण कर्मचारी नाहीत

बलिया येथे पाठवण्यात आलेले २९ व्हेंटिलेटर्स हाताळण्यासाठी प्रशिक्षण असणारे कर्मचारी उपलब्ध नसल्याने व्हेंटिलेटर्स पडून आहेत. उत्तर प्रदेशमधील मंत्री उपेंद्र तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ व्हेंटिलेटर्स बसंतपूरमध्ये आहेत. ११ व्हेंटिलेटर्स जिल्हा रुग्णालयामध्ये आधीच्या समाजवादी पक्षाच्या कार्यकाळापासून आहेत.

कौशांबीमध्ये खासगी रुग्णालयांकडून वापर पण…

कौशांबीमध्येही २४ व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते. यापैकी १५ खासगी रुग्णालयांना पाठवण्यात आले तर ९ व्हेंटिलेटर्स न वापरताच धूळ खात पडून आहेत. हे व्हेंटिलेटर्स वापरण्यासाठी योग्य प्रशिक्षण असणारे कर्मचारी नसल्याने त्यांचा वापर झालेला नाही. आम्ही यासंदर्भात लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊ असं राज्याचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

२५ व्हेंटिलेटर्सपैकी १८ सदोष

लखीमपुर खेरी येथील करोना रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर्सबद्दलचा असाच बेजबाबदारपणा दिसून येत आहे. पाठवण्यात आलेल्या २५ व्हेंटिलेटर्सपैकी १८ सदोष आहेत. अलीगढमधील दिनदयाल रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेल्या ६० व्हेंटिलेटर्सपैकी ५० काम करत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात माजी मंत्री दलवीर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रही लिहिलं आहे.

पंजाबमध्ये व्हेंटिलेटर्स झालाय राजकारणाचा विषय

पंजाबमधील फरदीकोट येथे अशाच प्रकारे व्हेंटिलेटर्स न वापरता धूळ खात पडल्याचं दिसत आहे.

Story img Loader