गाझियाबादमध्ये (उत्तर प्रदेश) दिल्लीच्या एका महिलेने तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप केलला आहे. मात्र या महिलेने केलेला दावा खोटा असल्याचं गाझियाबाद पोलिसांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे पोलीस खोटं बोलत असल्याचा महिलेकडून आरोप होत आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, हे संपूर्ण षडयंत्र संपत्ती हडपण्यासाठी रचलं गेलं होतं, ज्या संपत्तीवरून महिला आणि आरोपींमध्ये वाद होता. याशिवाय महिलेच्या तीन सहकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे. आमच्याकडे पुरसे पुरावे आहेत, असंही पोलीस म्हणाले आहेत.
तर, महिलेने दावा केला होता की तिच्यावर पाच जणांनी दोन दिवस सामूहिक बलात्कार केला होता. याशिवाय या महिलेने रुग्णलायतील वॉर्डमधून एक व्हिडिओ सोशल केला आहे आणि त्यात पोलीस खोट बोलत असल्याचा आरोप केला आहे.
गुरु तेगबहादूर रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या पीडितेची प्रकृती स्थिर असून, तिला कोणतीही अंतर्गत गंभीर दुखापत झालेली नाही. तथापि, रुग्णालयातील सूत्रांनी असेही सांगितले की, या महिलेच्या शरीरावर लैंगिक अत्याचाराच्या काही खुणा आढळल्या. तिच्या शरीरात एक ‘बाहेरची वस्तू’ (फॉरेन ऑब्जेक्ट) दिसत आहे.
दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणी गाझियाबाद पोलिसांना नोटीस बजावली. आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी नोटिशीत म्हटले आहे, की या दुर्दैवी घटनेतून ‘निर्भया’प्रकरणाची आठवण झाली. ही दिल्लीची रहिवासी महिला गोणीत गुंडाळलेली, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळली होती.