Ghaziabad Suicide News : गेल्या काही महिन्यांपासून पत्नी किंवा सासरकडील लोकांच्या छळामुळे पतीने आत्महत्या केल्याच्या काही गंभीर घटना समोर आल्या आहेत. बंगळुरूतील सॉफ्टवेअर इंजिनियर अतुल सुभाष, हुबळीतील पीटर गोल्लापल्ली, इंदूरमधील नितीन पडियार आणि आग्र्यातील मानव शर्मा आत्महत्याप्रकरण ताजं असतानाच आता गाझियाबादमध्ये अशीच घटना घडली आहे. येथील मोदीनगर परिसरात राहणाऱ्या एका इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

या इसमाने आत्महत्येपूर्वी मित्रांना व काही नातेवाईकांना एक संदेश पाठवला होता. त्यामध्ये त्याने त्याला होत असलेला त्रास, पत्नीकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख केला आहे. दरम्यान, या इसमाच्या आत्महत्येनंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मृत इसमाची पत्नी, तिचा भाऊ व वहिनी, तसेच तिच्या दोन मामांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या

येथील कृष्णापुरी भागात राहणारे जयप्रकाश त्यागी यांचे पुत्र मोहित त्यागी एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. २०२० मध्ये संभल जिल्ह्यातील एका तरुणीशी त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर एक वर्षाने त्यांना मुलगा झाला. मात्र काही दिवसांनी घरात मोहित व त्यांच्या पत्नीची भांडणं होऊ लागली. पत्नी मोहित यांना छळत होती असा आरोप करण्यात आला आहे. पत्नी त्यांना शिव्या देत होती, खोटा गुन्हा दाखल करून तुरंगात टाकण्याची धमकी देत होती. मात्र, घर तुटू नये यासाठी मोहित सगळं सहन करत होते, असं मोहित यांच्या कुटुंबियांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

पत्नीची मोहित यांच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत तक्रार

सहा महिन्यांपूर्वी मोहित यांची पत्नी घरातील दागिने घेऊन माहेरी गेली होती. याप्रकरणी मोहित यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, १५ एप्रिल रोजी मोहित व त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यातून बोलावणं आलं. कारण यावेळी मोहित यांच्या पत्नीने त्यांच्या कुटुंबाविरोधात तक्रार केली होती. तेव्हापासून मोहित चिंतेत होते. अशातच मोहित यांनी एका विषारी पदार्थाचं सेवन केलं. त्यांच्या कुटुंबातील लोकांनी त्यांना रुग्णालयात नेलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पत्नीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न, मोहित त्यागी यांचा आरोप

आत्महत्येपूर्वी मोहित यांनी त्यांच्या नातेवाईकांना व मित्रांना एक संदेश पाठवला होता. त्या संदेशात म्हटलं आहे की “मी माझी पत्नी प्रियंका त्यागीमुळे (मुक्काम सतुपुरा) त्रस्त असून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमागे पत्नी प्रियंका, तिचा भाऊ पुनीत, तिची वहिनी नीतू त्यागी आणि तिचे दोन मामा – अनिल व विशेष त्यागी ही पाच माणसं आहेत. लग्न झाल्यापासूनच प्रियंकाचं वागणं मला खटकत होतं. ती सुरुवातीपासूनच मला त्रास देत होती. प्रियंका व तिचे कुटुंबीय माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहित यांचे पत्नीवर गंभीर आरोप

मोहित यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे की प्रियंका माझ्याशी रोज भांडते, माझ्या कुटुंबीयांशी उद्धटपणे बोलते-वागते, लहान-मोठ्या कारणावरून घर सोडून माहेरी निघून जाते. तिथे जाऊन माझी व कुटुंबाची बदनामी करते. मला नेहमी वाटायचं की प्रियंकाने दुसराच कुठला तरी हेतू मनात ठेवून माझ्याशी लग्न केलं आहे. ती लग्न करून संसार करण्याचा विचार करत नाही. तर, माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून मोठी रक्कम उकळण्याच्या किंवा मला एखाद्या खोट्या गुन्ह्यात (उदा. हुंडा प्रकरण) अडकवून पैसे लाटण्याचा तिचा कट आहे. तिने तिच्या मामांबरोबर मिळून हा कट रचला आहे.