Delhi Crime News : आरटीओ अधिकारी असल्याचं सांगून एका व्यक्तीने अनेक लोकांकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडला आहे. या प्रकरणातील आरोपीला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी गाझियाबाद येथील ३८ वर्षीय व्यक्तीला प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अधिकाऱ्याची बतावणी करून फसवल्याच्या प्रकरणात ही कारवाई केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने सांगितली आहे.
या प्रकरणातील आरोपीचं नाव आशिष शर्मा असं असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपीने आरटीओ अधिकारी असल्याचं भासवून अनेक नागरिकांशी संवाद साधत वाहनांवरील चलन प्रलंबित असल्याचं सांगत अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तसेच वाहन नोंदणी तपशीलांचा वापर करून त्याने अनेक वाहन धारकांना दंड त्वरित न भरल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याची धमकी देखील दिली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात एका व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपीने तक्रारदाराला चलन दंड म्हणून १२,५०० ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले होते. मात्र, त्यानंतर तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यानंतर संबंधित व्यक्तीने पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार दाखल केली. यानंतर तक्रारदार आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे बँक व्यवहार आणि कॉल रेकॉर्डवरून आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सदर व्यक्ती आशिष शर्माने गुन्हा कबूल केला. तो पूर्वी गाझियाबाद येथे एका आरटीओ कार्यालयात खासगी एजंट म्हणून काम करायचा. तसेच तो तेथील जुन्या वाहन नोंदणी फायली वापरायचा अशी माहिती चौकशीत समोर आली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच तो वाहन मालकांना लक्ष्य करण्यासाठी ऑनलाइन अॅपवरील माहितीसह हा डेटा वापरायचा. तसेच त्याची विश्वासार्हता वाढवण्यासाठी त्याने त्याच्या कॉलिंग प्रोफाइलवर पोलिसांचे लोगो आणि अधिकाऱ्यांचे फोटो देखील वापरले होते. दरम्यान, या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपीने फसवणुकीत वापरलेले दोन मोबाईल फोन आणि बँक अकाउंट तपशील जप्त केले आहेत, तसेच पुढील तपास सुरु असल्याची माहिती सांगितली आहे.