पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांनी त्यांचे भारतातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. जोपर्यंत परिस्थिती सुरळीत होत नाही, तो पर्यंत आपण भारतात कार्यक्रम करणार नाही, असे त्यांनी बुधवारी स्पष्ट केले.
शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे गुलाम अलींचा मुंबई आणि पुण्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी देशातील पुढील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आपल्याला विरोध करण्यासाठी भारतात जे काही घडले, त्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारतातील रसिकांनी कायमच खुल्या मनाने माझे आणि माझ्या गायकीचे स्वागत केले. पण नुकत्याच घडलेल्या घटनामुळे मला तीव्र दुःख झाले आहे. त्यामुळे मी तूर्ततरी भारतात न येण्याचा निर्णय घेतला आहे. मी एक गायक असल्यामुळे मी केवळ त्याबद्दलच बोलेन. राजकारणाबद्दल बोलण्यात मला अजिबात स्वारस्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
येत्या ८ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये आणि त्यानंतर लखनऊमध्ये गुलाम अलींचा कार्यक्रम होणार होता. मात्र, आता तो रद्द झाला आहे. शिवसेनेने त्यांच्या कार्यक्रमांना केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यक्रमांना राज्य सरकार पूर्ण संरक्षण उपलब्ध करून देईल, असे म्हटले होते.

Story img Loader