लखनऊ महोत्सवात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली आले, तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीच शिवसेनेच्या उत्तर प्रदेशमधील नेत्यांनी दिली आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या लखनऊ महोत्सवात सहभागी होण्यास गुलाम अली यांनी होकार कळवला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उत्तर प्रदेशमधील नेत्यांनी ही धमकी दिली.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित केल्याबद्दल शिवसेनेच्या मुंबईतील काही कार्यकर्त्यांनी ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन’चे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर काळी शाई फेकली होती. पुस्तक प्रकाशनाच्या दिवशीच सकाळीच चार ते पाच शिवसैनिकांनी कुलकर्णी यांच्या घराबाहेर त्यांची गाडी थांबवून त्यांना गाडीतून उतरण्यास भाग पाडले आणि त्यांच्यावर शाई फेकली.
जर गुलाम अली या कार्यक्रमासाठी लखनऊमध्ये आले तर आम्ही केवळ त्यांचा चेहराच काळा करणार नाही, तर त्यापेक्षा गंभीर कारवाई करू, अशी धमकीच शिवसेनेचे उत्तर प्रदेशमधील प्रमुख अनिल सिंग यांनी दिली.
गुलाम अली दिल्लीत आल्यापासून ते काय काय करतात, यावर आमचे लक्ष राहिल आणि त्यांना लखनऊमध्ये येण्यापासून रोखले जाईल. त्यातूनही जर ते सुरक्षा घेऊन कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचले, तर तिथेही त्यांना विरोध करतील आणि त्यांचा कार्यक्रम उधळून लावतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ मुस्लिमांच्या संतुष्टीकरणासाठी उत्तर प्रदेश सरकारने गुलाम अलींना या कार्यक्रमासाठी बोलावले आहे, असाही आरोप अनिल सिंग यांनी केला.

Story img Loader