शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विरोध डावलून पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांना शुक्रवारी गुजरातमधील एका कार्यक्रमात हनुमंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आध्यात्मिक गुरू मुरारी बापू यांच्या चित्रकूट धाम न्यासातर्फे १९ ते २२ एप्रिल दरम्यान आयोजित अस्मिता पर्वाची शुक्रवारी भावनगर जिल्ह्य़ातील तलगजरदा गावात पुरस्कार कार्यक्रमाने सांगता झाली. त्यात गुलाम अली यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल हनुमंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत निदर्शने केली. त्यातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कार्यक्रम संपल्यानंतर सोडून दिले. वास्तविक गुलाम अली यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने या पर्वाचे उद्घाटन होणार होते. पण त्यांचा कार्यक्रम ऐन वेळी काही अपरिहार्य कारणांनी रद्द करण्यात आला होता. सकाळी पुरस्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर गुलाम अली लगेच पाकिस्तानला परतले. गुलाम अली यांचा गेल्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईत होणारा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द करावा लागला होता. त्यानंतर केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांचे कार्यक्रम झाले होते.
गुलाम अली आणि अन्य पाच जणांना न्यासातर्फे हनुमंत पुरस्कार देण्यात आले. तर बॉलीवूड कलाकार धर्मेद्र यांच्यासह तिघांना नटराज पुरस्कार देण्यात आला. धर्मेद्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.