अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, ‘सरहद्द’ संस्था आणि पंजाब राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने घुमान येथे आयोजित करण्यात आलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मुख्य सोहळा दुपारी ४ वाजता सुरू होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ विकासमंत्री नितीन गडकरी हे उद्घाटक, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने प्रथेप्रमाणे ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून घुमान येथील नामदेव महाराज दरबार ट्रस्ट येथून सकाळी १० वाजता दिंडी निघेल. घुमान शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरत संमेलनस्थळी या दिंडीची सांगता होणार आहे. ग्रंथिदडीच्या पालखीत संत नामदेवांची ‘ब्रेल लिपी’तील गाथा ठेवण्यात येणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सांगितले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंजाबी लेखक गुरुदयाल सिंह प्रकृती अस्वास्थ्यामुळे हजर राहणार नसल्याने त्यांच्या शुभेच्छा संदेशाची ध्वनिचित्रफीत दाखविली जाणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या भाषणाने उद्घाटन सोहळ्याचा समारोप होणार आहे. तत्पूर्वी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.
संमेलनस्थळी सुरू असलेली ग्रंथप्रदर्शनाची तयारी

Story img Loader