रोम : इटलीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नव-फॅसिस्ट विचारधारेच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाने सर्वाधिक मते मिळवली आहेत. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर देशातील पहिले अतिउजव्या विचारसणीचे सरकार स्थापन होणार असून ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनतील, असे सोमवारी स्पष्ट झाले.
इटली हा युरोपीय महासंघाचा संस्थापक सदस्य देश आहे. शिवाय, युरोपातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था अशीही त्याची ओळख आहे. त्यामुळे अतिउजव्या आणि युरोपीय महासंघाच्या वाढत्या अधिकारांच्या विरोधात असलेल्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाच्या बाजूने निवडणुकीचा कल झुकल्याने संपूर्ण युरोपचे भू-राजकीय वास्तव बदलल्याचे मानले जाते. उजव्या आघाडीला सुमारे ४४ टक्के मते मिळाली आहेत, त्यापैकी मेलोनी यांच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाने २६ टक्के मते मिळवली आहेत. युरोपमधील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी मेलोनी यांच्या ऐतिहासिक विजयाचे स्वागत केले आहे.