प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल भाजपचे नेते गिरिराज सिंह यांच्याविरोधात बोकारोमधील न्यायालयाने बजावलेले अटक वॉरंट झारखंड उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. यामुळे गिरिराज सिंह यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.
बोकारोमधील जिल्हा व सत्र न्यायालयाने गिरिराज सिंह यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळल्यानंतर त्याविरोधात त्यांनी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी न्या. आर. आर. प्रसाद यांनी बोकारो न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला. बोकारोमधील न्यायालयाने गिरिराज सिंह यांच्याविरोधात २३ एप्रिल रोजी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला होता. तो उच्च न्यायालयाने रद्द केला.
नरेंद्र मोदी यांना विरोध करणाऱय़ांनी पाकिस्तानात जाऊन राहावे, असे वक्तव्य गिरिराज सिंह यांनी केले होते. त्यावरून त्यांच्याविरूद्ध तीन ठिकाणी प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.