गिरीश बापट यांचा विरोधकांना टोला
शहरातील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांना भाजप सरकारने गती दिली आहे. पुणे मेट्रो आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो अंतर्गत २० हजार कोटींची, तसेच जायका, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात मिळून २० हजार कोटींची कामे गेल्या पाच वर्षांत सुरू झाली आहेत, असा दावा भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी शनिवारी केला. हा विकास जनतेला दिसत असला, तरी काहींना मात्र आकडय़ांचीच भाषा कळते, असे प्रतिपादनही त्यांनी विरोधकांच्या आरोपांबाबत केले.
शहरात विकास कामे झालीच कुठे, अशी टीका करणाऱ्या विरोधकांच्या आक्षेपाला उत्तर देताना बापट म्हणाले, की पुणे मेट्रोची ११ हजार ४२० कोटींची, तर पीएमआरडीए मेट्रोची आठ हजार ११३ कोटींची कामे सुरू झाली आहेत. नदी सुधारणेच्या जायका प्रकल्पालाही मान्यता मिळून त्यासाठी ९८० कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी नऊ हजार कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत ११ हजार घरांची उभारणी झाली असून, पीएमआरडीएमध्ये हा आकडा ३० हजारांच्याही वर आहे. पीएमआरडीएच्या वर्तुळाकार रस्त्यासाठी १७ हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असाही दावा बापट यांनी केला.