स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि पराकोटीची स्पर्धा यामुळे उमेदवारांवर मोठा ताण निर्माण होत असल्याचा मुद्दा गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार अधोरेखित होत आहे. अनेकदा पालकांकडून, मुलांकडून, कोचिंग सेंटर्सकडून यावर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकदा हा ताण सहन न झाल्यामुळे मुलं अतिशय टोकाचं पाऊल उचलत असल्याचे धक्कादायक प्रकार गेल्या काही वर्षांत समोर आले आहेत. अशीच एक गंभीर घटना राजस्थानच्या कोटामध्ये घडली आहे. या घटनेनंतर अशा परीक्षा हेच आयुष्य किंवा अंतिम ध्येय असू शकत नाही ही बाब मुलांना समजावून सांगण्याची गरज व्यक्त होत आहे.
ही घटना राजस्थानच्या कोटामधील बोरखारा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. या भागात अशा प्रकारे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या काही घटना गेल्या काही वर्षांत घडल्याचं समोर आलं आहे. या वर्षभरातली ही विद्यार्थी आत्महत्येची कोटामधली दुसरी घटना आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी सकाळी या मुलीच्या पालकांनी तिच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बराच वेळ दरवाजा उघडला न गेल्याने आणि आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्यामुळे शेवटी पालकांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडल्यानंतर सगळा प्रकार उघड झाला. पोलिसांना यासंदर्भात कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या मुलीनं आपल्या आई-वडिलांसाठी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात JEE परीक्षेचा उल्लेख असल्याची माहिती समोर आल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
“आई-बाबा, मी JEE परीक्षा पास होऊ शकत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. मी एक लूजर आहे. मी एक वाईट मुलगी आहे. आई-बाबा, मला माफ करा. हा एकच पर्याय उरला आहे”, असं या नोटमध्ये म्हटल्याचंही वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
मुलीवर परीक्षेचा ताण
दरम्यान, कोटाचे पोलीस उपअधीक्षक धरमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी तिच्या पालकांसमवेत कोटा परिसरात राहात होती. ३० जानेवारी रोजी तिची JEE (Joint Entrance Examination) ची परीक्षा होती. प्रथमदर्शनी पाहाता तिच्यावर परीक्षेचा ताण होता असं दिसतंय. तिचे वडील एका बँकेत सुरक्षा कर्मचारी म्हणून नोकरीला आहेत. त्यांना तीन मुली असून सदर मुलगी घरात सर्वात मोठी होती. या मुलीनं १२वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. पण या परीक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे ती डमी परीक्षा देत असतानाच JEE साठीची तयारी करत होती.