संपूर्ण देशभर नववर्षाच्या स्वागताचा उत्साह सळसळून वाहत असताना बंगळुरूमध्ये एक दुःखद घटना समोर आली आहे. २१ वर्षीय विद्यार्थीनीला नव वर्षानिमित्त एका मॉलमध्ये फोटोशूट करायचे होते. तिच्या पालकांनी सदर फोटोशूटला परवानगी नाकारल्यानंतर विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बंगळुरूच्या सुदामनगर येथे वर्शीनी ही २१ वर्षीय तरुणी बीबीए कोर्सची विद्यार्थीनी होती. रविवारी सकाळी राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, वर्षीनीने फोटोग्राफीचा कोर्स केला होता. तिला एका मॉलमध्ये जाऊन नवीन वर्षानिमित्त फोटोशूट करायचे होते. पण तिच्या पालकांनी यासाठी नकार दिल्यानंतर ती रागारागात आपल्या खोलीत गेली आणि त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले.
हे वाचा >> नववर्षाची पार्टी करून येताना सहा मित्रांवर काळाचा घाला; गाडीचा चुराडा, गॅस कटरने…
आम्हाला अद्याप आत्महत्येच्या कारणाबाबतची नोट मिळालेली नाही. पण आम्ही वर्षीनीच्या मोबाइलची तपासणी करत आहोत, कदाचित तिने आत्महत्या करण्यापूर्वी कुणाला मेसेज केलेला असावा, अशीही माहिती पोलिसांनी दिली. वर्षीनीच्या वडिलांनी या अपमृत्यूबाबतची तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. वर्षीनीचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
नववर्षानिमित्त आनंदाचे वातावरण असताना अनेक ठिकाणी काही दुःखद आणि दुर्दैवी घटना घटल्या आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील पाचपाखाडी भागात सोमवारी सकाळी मोटारीचे चाक पंक्चर होऊन चालकाचा ताबा सुटून रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला मोटार धडकली. या धडकेत पाच प्रवासी गंभीर जखमी झाली असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
आणखी वाचा >> नववर्षाच्या पार्टीत वकिलाने केली जातीवाचक टिप्पणी; सुरक्षा रक्षकाने गोळीबार करत केली हत्या
झारखंडमध्ये नववर्षाची पार्टी करून घरी परतणाऱ्या आठ मित्रांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.
पंजाबमधील जालंदर येथे खळबळजनक घटना घडली असून एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. कर्जबाजारीपणामुळे कुटुंबानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. मृतांमध्ये एक पुरूष, ३ महिला आणि एका ३ वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे.
नववर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी वाराणसी येथे आयोजित केलेल्या पार्टीतही एक धक्कादायक प्रकार घडला. वाराणसीमध्ये नववर्षानिमित्त एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. आयोजक असलेल्या वकिलाने एक जातीवाचक टिप्पणी केल्यानंतर ती न आवडल्यामुळे सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला, त्यात वकिलाचा मृत्यू झाला.