Father And Brother Shot Girl In Gwalior In Honor Killing Case : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच २० वर्षांच्या मुलीची, लग्नाच्या फक्त चार दिवस आधी गोळ्या घालून हत्या केली आहे. मृत मुलीने तिच्या कुटुंबाने ठरवलेल्या लग्नाला विरोध केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसमोरच ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान या घटनेतील पीडित मुलीची तिला आवडत असलेल्या तरुणाबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावरून तिचा कुटुंबीयांशी वाद झाला त्यानंतर आरोपीने आपल्या मुलीवर गोळ्या झाडल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्वाल्हेरमधील गोल का मंदिर परिसरात मंगळवारी संध्याकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणीची हत्या झाली. पीडितेचे वडील महेश गुर्जर यांनी त्यांच्या मुलीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे देशी बनावटीच्या बंदुकीने तिच्यावर गोळीबार केला. यावेळी घटनास्थळी पीडित तरुणी तनुचा चुलत भाऊ राहुल हा सुद्धा उपस्थित होता. महेशनंतर त्यानेही तरुणीवर गोळ्या झाडल्या ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीचे आरोप

हत्येच्या काही तास आधी, तनुने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने कुटुंबीयांनी इच्छेविरुद्ध लग्नासाठी दबाव आणल्याचा आरोप केला. ५२ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, तिने तिच्या वडिलांवर आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याचबरोबर जीवाला धोका असल्याचेही तिने यामध्ये सांगितले आहे.

“मला विकीशी लग्न करायचे आहे. सुरुवातीला माझे कुटुंबीय यासाठी तयार होते पण नंतर त्यांनी याला नकार दिला. ते मला दररोज मारहाण करायचे आणि मला जीवे मारण्याची धमकी द्यायचे. जर मला काही झाले तर माझे कुटुंबीय जबाबदार असतील,” असे तनुने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

बापासह भावानेही झाडल्या गोळ्या

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथक तनुच्या घरी पोहोचले होते. त्यांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न केला. यासाठी पंचायतीची बैठकही बोलवण्यात आली होती. दरम्यान वडिलांनी तनुशी खासगीत बोलायचे असल्याचे म्हणत बाजूला नेले आणि तिच्यावर गोळ्या झाडल्या. इतकेच नव्हे तर, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या चुलत भाऊ राहुलने तनुच्या कपाळ, मान आणि नाकाच्या मधल्या भागात गोळ्या झाडल्या. यामुळे तिचा जागीत मृत्यू झाला. यावेळी पोलिसांना आरोपी बापाला पकडले पण चुलत भाऊ राहुल पळून गेला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl is killed by father and brother for refusing arranged marriage in gwalior madhya pradesh aam