Pakistan Girl Poisoned 13 Family Members: आपल्या आवडीच्या मुलाशी लग्न करण्यास घरच्यांनी नकार दिला, म्हणून पाकिस्तानमधल्या एका तरुणीनं १३ कुटुंबीयांची संतापाच्या भरात हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतात घडली आहे. या प्रकरणी सिंध पोलिसांनी सदर तरुणीला अटक केली असून तिच्यावर न्यायालयात रीतसर खटला चालवण्यात येणार आहे. या १३ मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालातून पोलिसांना त्यांच्या मृ्त्यूचं कारण समजलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी तिच्या कुटुंबासमवेत सिंध प्रांतामधील खैरपूरच्या हैबत ब्रोही गावात राहात होती. तिच्याच गावातल्या एका तरुणावर तिचं प्रेम होतं. पण जेव्हा तिनं घरच्यांना ही बाब सांगितली, तेव्हा त्यांनी या लग्नाला नकार दिला. कुटुंबीय तयार होत नसल्याचा राग मनात ठेवून आरोपी तरुणीनं तिच्या प्रियकरासोबत आपल्याच कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचला! न्यूज १८ नं पीटीआयच्या हवाल्याने यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

एकाच वेळी १३ जणांवर विषप्रयोग!

आरोपी तरुणीचा आपल्या कुटुंबीयांवरच्या संतापातून त्यांच्याविरोधात भयानक कट रचला. १९ ऑगस्ट रोजी या तरुणीनं तिच्या प्रियकराच्या मदतीने आपल्या कुटुंबातील तब्बल १३ जणांना जेवणातून विष दिलं. यामध्ये काही लहान मुलंही होती. जेवणानंतर या सगळ्यांना त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे त्या सगळ्यांचा मृत्यू झाला. जेव्हा या १३ मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं, तेव्हा त्या सगळ्यांचा मृत्यू विषामुळे झाल्याचं निदान समोर आलं.

पोलिसांनी जेव्हा यासंदर्भात अधिक सखोल तपास केला, तेव्हा आरोपी तरुणीनं त्या दिवशी घरात रोटी बनवण्यासाठीच्या पिठामध्येच विष मिसळल्याचं कबूल केलं. यासंदर्भात तरुणीच्या प्रियकराचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यानंतर रविवारी या दोघांना पोलिसांनी अटक केली.

रक्ताच्या थारोळ्यात सापडला MBBS चा विद्यार्थी; हत्या की आत्महत्या? संशयास्पद मृत्यूमुळे पोलीसही पेचात!

“रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व १३ जणांचा मृ्त्यू झाला. पोस्टमार्टेम अहवालामध्ये विषप्रयोगाचं कारण पुढे आलं. घरात फक्त सदर तरुणी सोडून इतर सगळ्यांचा मृत्यू झाल्यामुळे तिची चौकशी केली असता तिनं गुन्ह्याची कबुली दिली. प्रियकराशी लग्नाला नकार देत असल्यामुळे कुटुंबीयांच्या आलेल्या रागातून हे कृत्य केल्याचंही तिनं सांगितलं”, अशी माहिती खैरपूरचे वरीष्ठ पोलीस अधिकारी इनायत शाह यांनी पीटीआयला दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl killed 13 family members in pakistan poisoned angry over love affair pmw